दुर्देवी ! चार्जिंगदरम्यान झाला मोबाईलचा ‘स्फोट’ अन् 2 मुलांसह आईचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तामिळनाडूत मोबाईलचा स्फोट झाल्याने आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या करुरमध्ये घडली. या धक्कादायक घटनेमुळे तामिळनाडूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुथ्थुलक्ष्मी ( वय २९ ) असे या मृत महिलेचे नाव आहे.

मुथ्थुलक्ष्मी या मोबाईल चार्जिंगला लावून फोनवर बोलत होत्या. मग बोलल्यावर त्यांनी मोबाईल ठेवून दिल्यानंतर अचानक मोबाईलचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा की, त्यामध्ये मुथ्थुलक्ष्मी आगीत जळून खाक झाल्यातर खोलीत असलेला ३ वर्षाचा रणजित आणि २ वर्षाचा दक्षित देखील गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सहा वर्षांपूर्वी मुथ्थुलक्ष्मी आणि बाळकृष्ण यांचा विवाह झाला होता. दोघे गेले काही वर्षांपासून करुरमध्ये राहत असून, जेवणाच्या स्टॉलचा त्यांचा व्यवसाय होता. मात्र, कर्जाचा बोजा वाढल्यानंतर बालकृष्णने कुटूंबाला सोडून दिले. नंतर मुथ्थुलक्ष्मीने आपल्या कुटूंबाचा सांभाळ केला. लॉकडाऊन मुळे तिच्या कमाईत घट झाली होती आणि कुटूंब आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस पुढील तपास करत आहे.