कास पठार फुलांनी बहरलं, पण ‘कोरोना’मुळे ‘पर्यटन’ विस्कळीत

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना पावसाळ्याचे महिने आवडतात कारण या महिन्यात निसर्ग, डोंगर, दऱ्या, धबधबे, याठिकाणी जाऊन आनंद घेण्यास सर्वजण उत्सुक असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या अनुषंगाने सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आलेली आहे. पण निसर्गास रोखणार कोण. निसर्ग आपला चमत्कार दाखवतच राहणार. जागतिक दर्जाच्या कास पथावरावर विविध रंगाची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे.

परंतु, पर्यटक हे पाहण्यासाठी मुकण्याची शक्यता आहे. कारण कास पठार समितीकडून पर्यटकांना येण्यास निर्बध घातले आहेत. तसेच पठारावर प्रवेश करु नये, अशा आशयाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान, येथे आढळणाऱ्या फुलांच्या बाबत काही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तेरडा – सह्याद्री डोंगर रांगांत अनेक ठिकाणी ही वनस्पती उगवते. तिला तेरडा किंवा गौरीची फुले म्हणतात. जास्त उंच न वाढणारा जांभळा तेरडा. या फुलाने पठार व अन्य सडे उठून दिसून येतात.

पंद – जमिनीतील कंदापासून ही वनस्पती उगवून येते. गोल बटाट्या सारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची फांदी मोठी होत जाते.

टूथब्रश – हबनारिया हायनायना ही कंदवर्गीय वनस्पती असल्याने त्यावर टूथब्रशसारखी फुले पाहायला मिळतात.

सोनकी – सोन्यासारखी दिसणारी ही वनस्पती सोनकी, सोनकडी, शेनकडी या अनेक नावाने ओळखली जाते. जुलै महिन्यात ही सोनकी लोकांसोबत पक्षांना आकर्षित करते.

कुमुदिनी – कास पठारावरील महाबळेश्वर राजमार्गावर असणाऱ्या तलावात नायफंडीस इंडिका (पानभोपळा) ही वनस्पती आढळते. त्यामुळे या तलावाला कुमुदिनी तळे असे नाव पडले.

अभाळी – गवतवर्गीय असलेल्या या वनस्पतीची पाने व देठ जाडसर असतात. त्यावरती सप्टेंबरच्या आसपास आभाळी रंगांचे कप्प्या-कप्प्याची फुले येतात.

गवेली – ही वेलवर्गीय आहे. पिपाणीच्या आकाराचे फूल असते. आयफोमिया असे शास्त्रीय नाव आहे. काळी व पांढरी गवेली असे दोन प्रकार असतात.

चवर – चवर (हॅचोनिया कॅलिना) ही भूगर्भीय वनस्पती असून ती सहसा भूमिगत आढळतात. ही औषधी वनस्पती असून ती कीटक खाऊन टिकते. तिच्या पाकळ्यांच्या मध्यभागी एक सापळा दरवाजा असतो.

दरम्यान, येथे फुलांच्या हंगामाप्रमाणे फुले येतच राहतील. मागील काही दिवसांपासून धुके व पाऊस असल्याने फुले येण्याच्या हंगाम थोडा मागे पुढेही होऊ शकतो. थोडे ऊन पडले तर फुलांचा बहर चांगल्या प्रकारे उमलतो, अशी माहिती येथील वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली.