Thane News : घरापासून दुरावलेल्या चिमुकलीला पोलिसांनी मिळवून दिले आईबाबा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरापासून दुरावलेली चार वर्षीय मुलगी एका वाटसरूच्या सतर्कतेमुळे पुन्हा तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात कासारवडवली पोलिसांना गुरुवारी (दि. 17) रात्री यश आले. मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी पालकांनी तीला जवळ घेत गळाभेट घेतली. पालकांनी यावेळी पोलीस आणि त्या वाटसरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोलिसांनाही गहिवरून आले होते.

याबाबतची माहिती अशी की, घोडबंदर रोड येथील आझादनगर, ब्रम्हांड येथे एक चार वर्षीय चिमुकली रस्त्याच्या कडेला रडत असल्याचे एका वाटसरुला 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दिसले. त्या चिमुकलीला तिच्या आई बाबांबद्दल काहीच माहिती सांगता येत नसल्याने मोठी अडचण होती. अखेर त्याने तिला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले, महिला कॉन्स्टेबल फुुफाणे, बीट मार्शल पोलीस नाईक दरेकर आणि घुगे यांनी तिच्या फोटोसह माहिती सोशल मिडियावर प्रसारित केली. त्यानंतर ती ज्या परिसरात मिळाली, त्या भागात तिच्या आई वडिलांचा शोध घेतला. अनेक नागरिकांकडे केलेल्या चौकशीनंतर अखेर अर्ध्या तासांनी या पथकाने तिच्या पालकांचा शोध घेतला. नंतर तिच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन अखेर तिचे वडील आणि आजी यांच्या ताब्यात तिला दिले. मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर तिच्या आजीने तिला जवळ कवटाळले. पोलिसांनी तत्परता दाखवून मुलीला परत मिळवून दिल्याबद्दल या पालकांनी समाधान व्यक्त केले.