पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kasba Assembly Election 2024 | महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही वर्षात राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
दरम्यान यंदा विधानसभेसाठी कसबा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये गणेश भोकरे- मनसे , हेमंत रासने-भाजप, ऍड. ओंकार येनपुरे-महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, हुसेन नसरुद्दीन शेख- अपक्ष, अरविंद अण्णासो वालेकर- सनय छत्रपती शासन, शैलेश रमेश काची- राष्ट्रीय समाज पक्ष, प्रफुल्ल सोमनाथ गुजर- वंचित बहुजन आघाडी, कमल ज्ञानराज व्यवहारे-अपक्ष, सुरेशकुमार बाबुराव ओसवाल-अपक्ष, गणेश सीताराम बढाई-अपक्ष, रवींद्र हेमराज धंगेकर-काँग्रेस, सय्यद सलीम बाबा- बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) यांचा समावेश आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार, एकूण २,९०,४८४ पात्र मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १,४४,०३४ तर महिला मतदारांची संख्या १,४६,४४६ एवढी आहे. आता या आकडेवारीत बदल झालेला असू शकतो. दरम्यान आता कसबा विधानसभा मतदारसंघात २३ नोव्हेंबरला गुलाल कोण उधळणार? याची उत्सुकता आहे.