‘बनवाबनवी’ करत 25 ठिकाणी काम करणार्‍या शिक्षिकेचा ‘पर्दाफाश’, 13 महिन्यात कमवले होते 1 कोटी

कासगंज : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मूलभूत शिक्षण विभागाची मोठी फसवणूक करणाऱ्या शिक्षिकेला शनिवारी अटक करण्यात आली आहे. नाव बदलून 25 ठिकाणी काम करणार्‍या शिक्षीकेनं 13 महिन्यात 1 कोटीची कमाई केली होती. अखेर ती पोलिसांच्या जाळयात अडकली आहे. अनामिका शुक्ला असे या शिक्षिकेचे नाव आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये फसवणूक करून नोकरी करण्याच्या प्रकरणामुळे अनामिका शुक्ला चर्चेत आली होती. तिला कासगंज पोलिसांनी अटक केली आहे. कासगंजमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे अनामिका शुक्ला काम करत होती. शनिवारी राजीनामा देण्यासाठी आली असता पोलिसांनी तिला अटक केली. कासगंजच्या बेसिक एज्युकेशनच्या अधिकारी अंजली अग्रवाल यांच्या कार्यालयात तिने आपल्या जोडीदारामार्फत राजीनामा दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी तिच्या साथिदाराला कार्यालयात बसवून ठेवले. तिचा साथिदार कार्यालयात राजीनामा देण्यासाठी आला होता त्यावेळी ती रस्त्यावर त्याची येण्याची वाट पहात उभी होती.

अधिकाऱ्यांनी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना पाठवून तिला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अनामिका शुक्ला कासगंजमधील कस्तूरबा विद्यालयात फरीदपूरमध्ये विज्ञान शिकवण्याचे काम करत होती. तसेच ती पूर्णवेळ कार्यरत होती. मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला असता ती कस्तुरबा विद्यालयात आढळून आली. शुक्रवारी बीएसएने (मूलभूत शिक्षणाधिकारी) शिक्षिकेचा पगार काढून देण्यास मनाई केली होती. शुक्रवारी सायंकाळी शिक्षिकेने ही नोटीस पाहिली तेव्हा तिने शनिवारी सकाळी राजीनामा देण्यासाठी बीएसएच्या कार्यालयाबाहेर पोहचली. तिने राजीनाम्याची एक प्रत आपल्या सोबत आलेल्या एका युवकासोबत बीएसएसच्या कार्यालयात पाठवली. त्याच्याकडे शिक्षिकेबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, अनामिका शुक्ला बाहेर रस्त्यावर उभ्या आहेत.

यावर अंजली अग्रवाल यांनी सोरोन पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत तिला घेराव घालत पकडले. तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिला सोरोन कोतवाली येथे घेऊन आले. कोतवाली प्रभारी रिपुदमन सिंह यांनी सांगितले की, शिक्षिका अनामिका शुक्ला हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस तिची चौकशी करत आहेत. बनावट नोंदीवर नोकरी करणारी अनामिका शुक्ला हिला शनिवारी उत्तर प्रदेशच्या मूलभूत शिक्षण विभागाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती कासगंजमध्ये राजीनामा देण्यासाठी आली असता तिला अटक करण्यात आली. यापूर्वी ती कासगंजमधील कस्तूरबा गांधी कन्या शाळेतही गेली होती. तेथून तिने आपले कपडे इत्यादी सामान घेतले. यानंतर, जोडीदारासह बँकेतून पैसे काढण्यासाठी पोहचली. मात्र, यापूर्वीच बीएसएने 4 जून रोजी तिचे बँकेतील खाते सील केले होते. बीएसएच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. तिला पकडण्याची वाट सर्वजण पहात होते. अनामिकेच्या जोडीदाराने तिचा राजीनामा बीएसएकडे देताच तिला अटक करण्यात आली.