Dance Bar : लॉकडाऊनमध्येही छमछम सुरुच, पोलिसांनी छापा टाकून 19 जणांना केली अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. यात हॉटेल, बारवर बंदी घातली असतानाही नियम झुगारून काही आंबट शौकीन ग्राहकांनी काशीमिरा येथील मानसी ऑर्केस्ट्रा बारमध्ये मैफील रंगवून अश्लील डान्स व नोटांची उधळण सुरू केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी बारवर छापा टाकून ग्राहक व बारमधील कर्मचारी असे एकूण 19 जणांना अटक केली आहे. तसेच बारच्या चालक आणि मालकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी बारमधून 1 लाख 91 हजारांची रोकड, दारूच्या बाटल्या आणि यंत्र साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

काशीमीराच्या मीरागाव नाका येथील मानसी बारमध्ये नाचगाणी चालत असल्याची माहिती काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास मानसी बारवर छापा टाकला. त्यावेळी तिथे बारबाला अश्लील नृत्य करत होत्या तर ग्राहक नोटा उडवत होते. बारच्या 6 कर्मचाऱ्यांसह 13 ग्राहक अशा 19 जणांना पोलिसांनी अटक केली . तर बारमध्ये सापडलेल्या 6 बारबाला व 1 तृतीयपंथीची सुटका केली आहे. यापैकी 4 बारबालाना एका लहानश्या गुप्त खोलीत लपवून ठेवले होते.

विशाल पाठक, तिमआप्पा जोगी उर्फ महेशअण्णा, गोपाल गौडा, श्रीनिवास गौडा, रितेश सोनी, डाबोर सियाल अशी अटक केलेल्या बार कर्मचा-यांची नावे आहेत. तर आशिष जोशी, शैलेश झगडे, सुभाष झा, चिराग शाह, मयूर दाभोळकर, परेश मुजिंदरा, मौलिक शाह, जिग्नेश शाह, देविशंकर यादव, प्रकाश गनावत, रुपेश राठोड, भावेश पारेख, राजेश घारे अशी अटक केलेल्या ग्राहकांची नावे आहेत. अटक केलेले आंबटशौकीन ग्राहक हे मुंबईच्या विलेपार्ले , कांदिवली, अंधेरी, मांटुगा, एल्फिस्टन तसेच ठाणे येथील राहणारे आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या 19 जणांसह बारचा मालक रवी शेट्टी आणि श्याम कोरडे अशा 21 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.