कश्मीर चा आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नाही : ओवैसी 

दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातला स्वर्ग म्हणजे कश्मीर. हा जरी अत्यंत वादाचा आणि संवेदनशील भाग असला तरी तो  भारताचाच भाग आहे, यामध्ये पाकिस्तानने लुडबुड करणे बंद करावे असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये जो असंतोष आहे त्यावरून ओवेसी यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीका केली. केंद्रात भाजपाची सत्ता असो की काँग्रेसची काश्मीर खोऱ्यातले प्रश्न कुणालाही महत्त्वाचे वाटत नाहीत. काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवावा, तिथे सामान्य वातावरण निर्माण व्हावे.

तिथल्या नागरिकांनी, तरुण वर्गाने दहशतीच्या वातावरणात जगू नये असे काँग्रेसलाही वाटत नाही आणि भाजपालाही वाटत नाही अशीही टीका ओवेसी यांनी केली. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले पाहिजेत मात्र त्याचा अभावच आहे असेही मत ओवेसी यांनी मांडले. काश्मीर प्रश्न हा जेम्स बॉन्ड किंवा रॅम्बो सिनेमातील धोरणांप्रमाणे सोडवावा असे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

काश्मीर हा भारताचा भाग असल्यामुळे पाकिस्तानला नाक खुपसण्याची मुळीच आवश्यकता नाही असे ओवेसी यांनी म्हटले आहे. अशात एनडीए सरकारने काश्मीरी पंडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले? असाही प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. यासाठी त्यांनी केंद्राच्याच अहवालाचा दाखला दिला. काश्मीर प्रश्न सोडवण्यात कुणालाही रस नाही तो भिजत ठेवण्यातच जास्त रस आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही मतं मांडली.