पुलवामा चकमकीत 2 आतंकवाद्यांचा ‘खात्मा’, रियाज नायकूला जवानांनी घेरलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये कर्नल-मेजर यांच्यासह ८ सैनिक शहीद झाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. काही तास चाललेल्या सर्च ऑपरेशननंतर बुधवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील बेगपोरा भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू झाली. हिजबुल कमांडर रियाझ नायकूला घेरले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार रियाझ नायकू आणि पीएसओ (कव्हर देणारे दहशतवादी) ला घेरले आहे. सोबतच दक्षिण काश्मीरमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षा दलांचे अतिरिक्त पथकही घटनास्थळी पोहोचले असून आजूबाजूचा परिसर घेरला गेला आहे.

रियाझ नायकू लपून असल्याची खबर मिळाली होती
एका वृत्तसंस्थेनुसार, पोलीस, सैन्याच्या ५५ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री बेगपोरा येथे कॉर्डन सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरक्षा दलाची संयुक्त टीम संशयास्पद स्थानाकडे जात असताना लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरु झाली.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीची पुष्टीही केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिजबुलचा टॉप कमांडर रियाझ नायकू याच्यासह दोन ते तीन दहशतवादी अडकल्याची शंका आहे. अवंतीपोरा येथे आठ तासांच्या कालावधीत ही सलग दुसरी चकमक आहे.

या व्यतिरिक्त अवंतीपोराच्या शरशालीमध्ये दहशतवादी लपून असल्याची खबर मिळाली होती. यानंतर मंगळवारी रात्रीपासून येथे सर्च ऑपरेशन सुरू केले गेले. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार चालूच होता. बुधवारी सकाळी सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या चकमक सुरूच आहे.

त्याचवेळी पुलवामा येथील पंपोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने ४ दहशतवाद्यांना घेरले आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा सुरक्षा दलाला एका ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन केले गेले आहे.