श्रीलंका हल्ल्यामागे ‘काश्मीर कनेक्शन’ ; श्रीलंकेच्या सेना प्रमुखांचा दावा

कोलंबो : वृत्तसंस्था – रविवारी २१ तारखेला ऐन इस्टर संडे दिवशी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या हल्ल्याविषयी आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. साखळी बॉम्बस्फोटांसाठी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा श्रीलंकेच्या सेना प्रमुखांनी केला आहे. तसेच हे दहशतवादी बंगळुरु आणि केरळच्या काही भागातही जाऊन आल्याचे लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

सेनानायके म्हणाले की , ‘भारतात जाण्याचा दहशतवाद्यांचा नेमका हेतू काय होता याची माझ्याकडे संपूर्ण माहिती नाही.मात्र, ते कशाचेतरी प्रशिक्षण किंवा दुसऱ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील होते. तसेच दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटांवरून हा कट स्थानिक नसून बाहेरील शक्तींची मदत आहे. असे दिसून येते. श्रीलंकेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी गुप्त माहिती भारताकडून मिळाली होती. मात्र श्रीलंकेच्या मिलिट्री इंटेलिजेंसकडे वेगळीच माहिती होती. त्यामुळे, श्रीलंका वेगळ्या दिशेने काम करत होते. मात्र, यासाठी कोणाला दोषी ठरवता येणार नाही.’

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट –
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडे साजरा होत असताना शँग्रिला, किंग्सबरी आणि सिनामन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, बट्टीकलोआ चर्च, सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या साखळी बॉम्बस्फोटांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३५९ झाली असून पाचशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. नऊ आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यात महिलेचाही समावेश होता. त्यातील आठ हल्लेखोरांची ओळख पटली आहे. आतापर्यंत साठ श्रीलंकेच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३२ जण फौजदारी तपास पथकाच्या कोठडीत आहेत. अटक करण्यात आलेले बहुतेक जण ‘नॅशनल तोहीद जमात’ या संघटनेशी संबंधित आहेत.