हायअलर्ट ! भारतात हल्ले करण्यासाठी लष्करे तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, आयएसआयची पथके तयार : गुप्तचर संघटना

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर मध्ये ११ एप्रिल ते ६ मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत काश्मीरवर दहशतवादी हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हे हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्ष राहण्याचा सल्ला गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

काश्मीरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीतही दहशतवाद्यांनी काही उमेदवारांना धमकावले होते. मतदानावर बहिष्कार घालण्याचा आग्रह फुटीरतावादी गटांनी धरला होता. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतात हल्ले करण्यासाठी लष्करे तय्यबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने तीन पथके तयार केली आहेत. त्यातील दहशतवाद्यांना मतदान केंद्र, उमेदवारांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.’

या पार्श्वभूमीवर राज्यात काश्मीरमध्ये अलर्ट जारी केले आहे. गृहमंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त ८०० निमलष्करी दलाचे जवान पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.