एका पोलीस ठाण्यातून दुसर्‍या ठाण्यात पाठवत राहिले पोलीस, मुलाचा मृतदेह गोणीत भरून 3 KM पायी चालत होता हतबल पिता

कटिहार : बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे अतिशय लाजीरवाणे चित्र समोर आले आहे. सुशासनाचा दावा करणार्‍या या राज्यात मदत न मिळाल्याने हतबल पित्याला आपल्या 13 वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोणीत बंद करून तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली. हे भागलपुर जिल्ह्यातील गोपालपुर पोलीस आणि कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला पोलिसांची असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणामुळे घडले आहे. त्यांनी थोडी जरी माणूसकी दाखवली असती, मदतीसाठी अ‍ॅम्ब्युलन्स किंवा गाडी उपलब्ध करून दिली असती तरी पित्याला आपल्या मुलाचा मृतदेह गोणीत भरावा लागला नसता.

भागलपुर जिल्ह्यातील रहिवाशी असलेला पिता नीरू यादव यांनी सांगितले की, गोपाळपुरमधील तीनटंगा गावात नदी पार करताना त्यांचा 13 वर्षांचा मुलगा हरिओम यादव होडीतून पडला होता. यानंतर तो बेपत्ता होता. याबाबत गोपाळपुर पोलीस ठाण्यात सुद्धा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. नीरू ने मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली तेव्हा समजले की, मुलाचा मृतदेह कटिहार जिल्ह्याच्या कुर्सेला येथील खेरिया नदीच्या किनार्‍यावर तरंगत आहे.

ही माहिती मिळताच पिता नीरू यादव जेव्हा घाटावर पोहचले तेव्हा त्यांच्या मुलाचा मृतदेह सडलेल्या आवस्थेत मिळून आला. तो जनावरांनी ओरबाडला होता. मुलाचे कपडे आणि शारीराच्या अवयवावरून ओळख तर पटली, परंतु यानंतर सुरू झाली प्रशासनाची असंवेदनशीलता. मृतदेह आणण्यासाठी गोपाळपुर पोलीस किंवा कुर्सेला पोलीस गेलेच नाहीत. अ‍ॅम्ब्युलन्स सुद्धा पोलिसांनी पाठवली नाही.

दोन पोलीस ठाण्याच्या गोंधळात सापडलेला पिता अखेर आपल्या काळजाच्या तुकड्याला एका गोणीत टाकून घराकडे निघाला. पोलिसांच्या बेजबाबदारपणा बाबत बोलताना वडील नीरू यादव यांनी सांगितले की, करायचे तरी काय. पोलीसांनी गाडी उपलब्ध करून दिली नाही आणि सहानुभूती सुद्धा दाखवली नाही, यासाठी मृतदेह अशाप्रकारे आणावा लागला. आता प्रकरण माध्यमांमध्ये गाजल्यानंतर कटिहारचे डीएसपी अमरकांत झा जागे झाले असून त्यांनी प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.