कतरीना कैफ साकारणार ‘या’ अ‍ॅथलेटची भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. त्यामध्ये आता धावपटू पी. टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची भर पडणार आहे. दिग्दर्शक रेवती एस वर्मा या ह्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यात कतरिना कैफ पी. टी. उषांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, मेरी कोम या खेळाडूंवर बायोपिक आले आहेत.

या बायोपिकमध्ये पी. टी. उषा यांची भूमिका अभिनेत्री कतरीना कैफ हिने साकारावी अशी दिग्दर्शक रेवती एस वर्मा यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी कॅटरिनाची भेट घेतली आहे. मात्र अद्याप तिने या बायोपिकसाठी होकार दिलेला नाही. पण तिने हा चित्रपट स्वीकारलाच तर हा तिचा पहिला बायोपिक असेल.

पी. टी. उषा यांच्यावर बायोपिक येणार, अशी चर्चा २०१७ पासून सुरु आहे. आधी या चित्रपटासाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत होते. मात्र तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला तसेच इतर काही कारणास्तव हा चित्रपट रखडला. पण आता सुमारे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. पी. टी. उषाचे हे बायोपिक इंग्लिश, हिंदीसह चीनी, रशियन शिवाय अन्य भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची योजना आहे.

पी. टी. उषा यांचे पूर्ण नाव पिलुवालाकंडी टेकापरंविल उषा असून त्या भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखल्या जातात. १९८० मध्ये त्यांनी प्रथम ऑलंपिकमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.