अन् भाषण करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना न घेताच हेलिकॉप्टर झाले पसार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. काल सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पण याच दरम्यान उत्तर प्रदेशात प्रचाराचा जोर पहायला मिळाला. प्रचारादरम्यान नेत्यांचा थाट काही औरच असतो. पण उत्तर प्रदेशात मात्र एका माजी मुख्यमंत्र्याचे व्यासपीठावर भाषण चालू असतानाच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर त्यांना सोडून निघून गेले.

भाजपचे नेते आणि खासदार राजवीर सिंह प्रचारात व्यस्त होते. राजवीर सिंह हे कौशांबीमध्ये भाजप उमेदवार विनोद सोनकर यांच्या प्रचारासाठी पोहचले होते. त्याचवेळी ते व्यासपीठावर होते त्याचे विमान चक्क त्यांना न घेता उडून गेले. आपल्याला न घेताच विमान निघून गेल्यामुळे राजवीर नाराज झाले आणि त्यांनी पुढचा प्रवास कारमधून केला.

राजवीर सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. आणि राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे ते पुत्र आहेत. हेलिकॉप्टर खासदारांना न घेता का निघून गेले याबाबत माहिती अद्याप मिळवू शकली नाही मात्र या सगळ्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.