नक्षलवाद्यांच्या ताब्यात 6 दिवस जंगलात राहिला पोलिस कर्मचारी, पत्रकारांनी आणलं सोडवून

विजापूर :  वृत्तसंस्था –   अपहरण हा शब्द जेव्हाही टीव्ही-रेडिओवर ऐकता तेव्हा काही गोष्टी समान असतात. पत्रकार याबाबत माहिती देतात आणि पोलीस गुन्हेगारांचा तपास करतात. पण छत्तीसगडमध्ये याच्या उलट एक प्रकरण समोर आले आहे. येथे पोलिसांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले. त्यांनी पोलिस कर्मचारी संतोष कट्टमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि सहा दिवसांपासून जंगलात फिरवत राहिले. पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नी व मुलीला काही सुचले नाही, तेव्हा त्यांनी पत्रकारांकडे मदत मागितली. काही पत्रकार मदतीसाठी पुढे आले. त्यांनी तीन दिवस संतोष कट्टमचा तपास केला. सुदैवाने ते नक्षलवाद्यांशी संपर्क साधण्यात यशस्वी झाले आणि संतोषला सुखरूप सोडवून देखील आणले.

ही घटना छत्तीसगडची आहे. सुकमा जिल्ह्यातील संतोष कट्टम पोलीस विभागात इलेक्ट्रिशियन म्हणून भोपाळपट्टणम येथे तैनात आहे. संतोष सुट्टी घेऊन विजापूरला आला होता आणि लॉकडाऊनमध्ये अडकला. ते ४ मे रोजी ते गोरना येथे जत्रेत गेले होते. तिथे लपलेल्या नक्षलवाद्यांना त्याचा संशय आला. संतोष हा पोलिस कर्मचारी असल्याचे समजताच नक्षलवाद्यांनी त्याचे अपहरण केले. नक्षलवाद्यांनी त्याचे दोन्ही हात मागे बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली.

संतोषची पत्नी सुनीता आणि मुलगी भावना यांना अपहरण झाल्याची माहिती मिळाली. पत्नी सुनीताने आपल्या मुलीसह संतोषला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आवाहनावर ७ मे रोजी काही पत्रकार मदतीसाठी पुढे आले. या पत्रकारांनी तीन-तीन जणांचा गट केला. काही पत्रकार महाराष्ट्र आणि काही आंध्र प्रदेशच्या सीमेकडे गेले. ते तीन दिवस दुर्गम जंगलांमध्ये संतोषला शोधत राहिले. कोणीही संतोषबद्दल माहिती देण्यास तयार नव्हते. अखेर १० मे रोजी पत्रकार गणेश मिश्रा, रंजन दास आणि चेतन खपरवार यांच्या टीमला एक बातमी मिळाली. पत्रकार गणेश मिश्रा यांना फोन आला. त्यात म्हटले की ११ मे रोजी एका गावात जनअदालत आहे. यामध्ये संतोष बद्दल निर्णय होईल. त्यांना हवे (पत्रकारांना) असल्यास ते तिथे येऊ शकतात आणि संतोषच्या पत्नी व मुलीलाही आणू शकतात.

११ मे रोजी नक्षलवादी त्यांच्या भागात जनअदालत घेतात. सुमारे १५०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत संतोषला जनअदालत मध्ये हजर करण्यात आले. जन अदालतमधील नक्षलवाद्यांनी कबूल केले की, संतोषने पोलिसात असतानाही कोणावर अत्याचार केलेला नाही. मग ग्रामस्थांना विचारले की, संतोषला मारले पाहिजे की सोडले पाहिजे. ग्रामस्थांनी सोडून देण्यास सांगितले. यावर संतोषला पोलिसांची नोकरी सोडून द्यावी, या अटीवर सोडण्यात आले.

संतोष कट्टम सुटकेनंतर पत्रकारांसह पोलिस ठाण्यात पोहोचला. बस्तर रेंजचे आयजी पी. सुंदरराज म्हणाले की, संतोष आता आमच्यासोबत आहे. आम्ही त्याच्याकडून अपहरणासंबंधित सर्व माहिती घेत आहोत. संतोष कट्टमने सांगितले की, तो सहा दिवस डोळ्यांवर पट्टी बांधून जंगलात इकडे-तिकडे फिरत राहिला. त्याचे दोन्ही हात मागे बांधलेले होते. तो किती चालला, कोठे पोहोचला, आसपास कोण आहे हे त्याला समजत नव्हते. त्याला खाण्यासाठी पक्षाचे मांस आणि वाळलेले मासे दिले जात होते. त्याने सांगितले की, जेव्हा नक्षलवादी लीडर येऊन चौकशी करत असे तेव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली जात नव्हती. त्याला नेहमी वाटायचे की त्याला कधीही गोळी मारली जाईल. त्याचे नशीब की नक्षलवाद्यांनी त्याला सोडून दिले.

स्थानिक पत्रकार सुरेश महापात्रा म्हणतात, ‘बिहारमध्ये आम्ही पत्रकार दोन्ही बाजूंनी चालतो. कधी आम्हाला नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी दिली जाते तर कधी पोलिसांची भीती असते. असे असूनही अशी बरेच कामे असतात, ज्यासाठी आम्हाला पुढे यावे लागते.