73 वर्षाचा वर अन् 67 ची वधू ! ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहिले 50 वर्ष, आता मुलांनी लावलं ‘लग्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात एक आगळेवेगळे लग्न झाले. येथे, ७३ वर्षीय वराने एका ६७ वर्षीय वधू बरोबर लग्न केले आहे. जी इच्छा ५० वर्षांपूर्वी त्यांना होती, ती इच्छा आता मुलाने पूर्ण केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करताना मुलाने हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचे ऐतिहासिक पद्धतीने लग्न लावून दिले. शेकडो लोक या लग्नाचे साक्षीदार झाले आहेत. कवर्धा जिल्ह्यातील खैरझीती गावात राहणाऱ्या ७३ वर्षीय सुकाल निषाद आणि ६७ वर्षीय गौतरहीन बाई निषाद यांचे १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे वर प्रेम विवाह झाला. या जोडप्याला तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी असून त्या तिघांचे लग्नही झाले आहे.

खरं तर सुकाल राम यांना वाईट वाटत होते की त्यांचे लग्न रितीरिवाजाने आणि धुमधडाक्यात झाले नव्हते. या संदर्भात गावात अशी चर्चा होती की, मृत्यूनंतर त्यांना मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणूनच त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या आणि परिवारातील सगळ्यांच्या मर्जीने गावात चालू असलेल्या नवधा रामायण स्थळावर सर्वांच्या सहमतीने वरमाळांचा कार्यक्रम केला. त्यानंतर हळद लावण्यात आली आणि परंपरेनुसार त्यांचे लग्न लावण्यात आले. या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

एक जगावेगळी प्रेमकहाणी
या प्रेमकथेची सुरुवात ५० वर्षांपूर्वी सुरू झाली होती, जेव्हा सुकाल राम आपल्या मित्रासाठी मुलगी पाहण्यासाठी बेमेतरा जिल्ह्यातील बिरसिंघी या गावी गेले होते. ज्या मुलीला पाहण्यासाठी ते गेले होते, त्या मुलीचीच धाकटी बहीण गौतरहीन निषाद होती, जी की सुकाल यांना आवडली होती. पण त्यावेळी सुकाल यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने दोघांचे लग्न होऊ शकले नाही. मात्र नंतर सुकालने लग्न न करताच गौतरहीनला पत्नी म्हणून घरी आणले होते.

सुकाल राम यांचा मुलगा धन्नू निषाद याने सांगितले की, लग्न न केल्यास मोक्षप्राप्ती होत नाही. त्यामुळे गावातील आणि कुटुंबातील सगळ्यांच्या मर्जीने हे लग्न लावण्यात आले. सर्वांनी या लग्नात हजेरी लावली आणि रितीरिवाजाप्रमाणे वरात काढून धुमधडाक्यात हे लग्न लावण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की, आधी काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नव्हते. गावात चर्चा होती की ते जर लग्न न करताच मृत्यू पावले तर त्यांचा आत्मा गावात वास करणार. त्यामुळे सगळ्यांच्या मर्जीने पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे लग्न लावण्यात आले.

You might also like