पूरामुळे उध्वस्त झाले काजीरंगा पार्क, 47 जीवांचा गेला बळी, जंगलातून पळाले वाघ

गुवाहाटी : आसाममध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे काजीरंगा नॅशनल पार्क उध्वस्त झाले आहे. पार्कचा 90 टक्के भाग पाण्यात बुडाला आहे. यामध्ये 47 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. असंख्य प्राणी बेपत्ता आहेत. याशिवाय जंगलातून पळालेले वाघ आजूबाजूच्या गावात दिसून येत आहेत.

काजीरंगा नॅशनल पार्क आणि पोबितोरा वाईल्डलाइफ अभयारण्याची स्थिती खुपच बिकट झाली आहे. एका शिंगाचा गेंडा, हरण आणि हत्ती पळून जाऊन त्यांनी उंचावर आश्रय घेतला आहे. अनेक प्राणी तर उंचावर तयार करण्यात आलेल्या शेल्टरमध्ये लपलेले आहेत.

बहुतांश प्राणी कार्बी आंगलाँग हिल्सकडे पळाले आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने पार्कच्या शेजारून जाणारा हायवे-37 वर गाड्यांचा वेग कमी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याचे सक्तीने पालन केले जात आहे. कारण हाच रस्ता ओलांडून जनावरे उंच ठिकाणी जात आहेत.

काजीरंगा नॅशनल पार्क अथॉरिटीनुसार संपूर्ण नॅशनल पार्कचा 90 टक्के भाग पूराच्या पाण्यात बुडाला आहे. पार्कच्या आतमध्ये बनवण्यात आलेल्या 223 शिकार-विरोधी कॅम्पमध्ये 166 कॅम्स पाण्यात बुडाले आहेत. याशिवाय पार्कच्या कर्मचार्‍यांनी सात शिकार-विरोधी कॅम्प सोडले आहेत.

पार्क अथॉरिटीने सांगितले की, सुमारे 47 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक गेंडा, 41 हॉग डियर, तीन जंगली डुक्कर यांचा समावेश आहे. या प्राण्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे.

सोमवारी काजीरंगा नॅशनल पार्कजवळच्या एका गावात वाघ आढळला होता. वन कर्मचार्‍यांनी सांगितले की, पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी वाघ मनुष्यवस्तीत लपण्यासाठी गेला असेल. किंवा उंच जागेच्या शोधात तो असेल.

काजीरंगा नॅशनल पार्कच्या जवळील कंडोलीमारी गावात एका बकर्‍यांच्या शेडमध्ये हा कमी वयाचा वाघ दिसून आला. तो आतमध्ये लपून बसला होता. वन विभागाचे कर्मचारी वाघाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी वाघाला सुरक्षित वाचवले.

अशाच प्रकारे, मोरीगाव जिल्ह्यातील पोबितोरा वाईल्डलाइफ अभयारण्याचा 80 टक्के भाग सुद्धा पाण्यात बुडाला आहे. हे अभयारण्य तर मागील दोन महिन्यात तिनवेळा पुराच्या पाण्यात बुडाले आहे. 24 शिकार विरोधी कॅम्पमधून 12 कम्प पाण्यात बुडाले होते.

पोबितोरी अभयारण्याचे रेंजर मुकुल तामुली यांनी सांगितले की, 29 जूनला आलेल्या पुरानंतर आतापर्यंत एका गेंड्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 29 जूनला दुसरा पूर आला होता. आम्ही सध्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

एक शिंगांच्या गेंड्यांची सर्वात जास्त संख्या काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये आहे. येथे 2600 पेक्षा जास्त एक शिंगाचे गेंडे आहेत. 2018 च्या रिपोर्टनुसार काजीरंगा पार्कमध्ये 2413 गेंडे आणि पोबितोरामध्ये 102 एक शिंगाचे गेंडे आढळले होते.