जेव्हा आयुक्तांनाच ‘स्कायवॉक’वर खावे लागतात धक्के

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आणि परिसरात फेरीवाले हा एक महत्वाचा मुद्दा कायमच बनून राहिला आहे. कारवाई केली तरी वाद आणि नाही केली तरी वाद असा कचाट्यात सापडलेला हा विषय आहे. कल्याण, डोंबिवलीमध्येही फेरीवाल्यांचा हा प्रश्न जिकिरीचा झाला आहे. हा प्रश्न समजावून घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: स्कायवॉकवर फिरून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना धक्के खातच स्कायवॉक ओलांडावा लागला.

कल्याण, डोंबिवली येथील स्कायवॉकची आयुक्त सूर्यवंशी यांनी अचानक पहाणी केली. बरोबर केवळ एक शिपाई घेऊन ते डोंबिवलीच्या स्कायवॉकवर आले. तेव्हा त्यांना दोन्ही बाजू फेरीवाल्यांनी व्यापलेल्या दिसून आल्या. फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूला बस्तान मांडले असल्याने पादचाऱ्यांना जाण्यासाठी थोडीच जागा उरत होती. त्यातून पादचारी एकमेकांना धक्के देत धावत होते. त्यात डोक्यावर सामान घेऊन जाणारे प्रवासी तसेच विक्रेते आयुक्तांना ओलांडून जात होते.

त्यांनी संपूर्ण पायी फिरुन स्कायवॉक पाहिला. त्यानंतर तातडीने या स्कायवॉकवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

You might also like