क्रोध, प्रेम, संकट यांचा सामना…. केदारनाथचा टीझर रिलीझ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – बहुचर्चित ‘केदारनाथ’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. केदारनाथ येथे झालेला निसर्गाचा प्रकोप या सिनेमात दाखविण्यात आला आहे. सारा अली खानसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसेल. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथच्या पार्श्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा असं या चित्रपटाचं स्वरूप आहे.विशेष म्हणजे या टीझरमध्ये एकही संवाद नाही.
केदारनाथ हा चित्रपट २०१३ मध्ये उत्तराखंड येथे आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटामध्येमध्ये सुशांत पिठ्ठूच्या तर सारा खान पर्यटकाच्या भूमिकेत दिसणार आहे.चित्रपटाचा सर्वाधिक भाग उत्तराखंडमध्येच चित्रीत करण्यात आला आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. साराचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं तिच्या पदार्पणाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
काय आहे टीझरमध्ये –
केदारनाथमध्ये आलेल्या महापूरादरम्यान घडणारी प्रेमकथा या सिनेमातून दाखविण्यात आली आहे. केदारनाथ मंदिरा पर्यंत लोकांना पाठीवरून घेऊन जाणाऱ्या पिठ्ठूची भूमिका सुशांत सिंह राजपूतने साकारली आहे. त्याचसोबत तो गाईडचे काम करतानाही दिसतो. एका मुस्लिम तरुणाच्या भूमिकेत सुशांत दिसणार आहे. तर साराने एका हिंदू तरुणीची भूमिका साकारली आहे. केदारनाथमध्ये आलेल्या या महापूरात सुशांत मंदिरातील नंदीचे शिंग धरून आधार घेताना या टीझरमधून दिसतो. केदारनाथचे माहात्म्यही या सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चहुबाजूंनी येणारे पाणी, ढगफुटी, कडाडणारी वीज, मुसळधार कोसळणारा पाऊस असे निसर्गाचे रौद्र रूप या टीझरमधून पाहायला मिळते. त्यादरम्यान या महापुरातील पाण्यात अडकलेले केदारनाथ यात्रेतील भक्तगण आपला बचाव कसा करतात? त्यांचा हा थरार या टीझर मधून पाहायला मिळतो. स्पेशल इफेक्टसमुळे हा थरार अंगावर अक्षरश: काटा आणतो. येत्या ७ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.