केडगावमध्ये चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही

दौंड | पोलीसनामा आॅनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणी आले नसल्याने महिला आणि मुलांचे पाणी आणण्यासाठी मोठे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा ऋतू संपण्याच्या उंबरठ्यावर असतानाच पाण्याची इतकी मोठी चन चन भासू लागल्याने येणारी आठ महिने कशी जातील याची मोठी चिंता येथील नागरिकांना लागून राहिली आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव हे मुख्य गाव असून या गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. परंतु वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी, रस्ते, वीज याचे करण्यात येत असलेले नियोजन मात्र फोल ठरताना दिसत आहे. केडगाव गावठाणामध्ये पाणी साठवणूक आणि पुरवठा करण्यासाठी पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली आहे, परंतु या टाकीचे अजून नेमके कोणते काम बाकी आहे कि ज्यामुळे या टाकीमध्ये पाणी साठवणूक आणि पुरवठा केला जात नाही. हा येथील नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. तरी या टाकीमधून त्वरित पाणी पुरवठा करण्यात यावा जेणेकरून ग्रामस्थांना याचा मोठा फायदा होईल अशी मागणी होत आहे.
कारण सध्या केडगावमध्ये सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न हा पाण्याचा असून या मूलभूत गरजेचे योग्य नियोजन करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे.

पावसाळ्याच्या शेवटीच जर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत असेल तर येणाऱ्या काही महिन्यांत केडगावची अवस्था मोठी बिकट बनलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे केडगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजन होऊन पुढील काळात ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वन वन थांबण्यासाठी योग्य पर्याय काढण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.

याबाबत केडगावचे सरपंच अजित शेलार यांनी  केडगावमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये पाणी कमी असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, परंतु काही दिवसांमध्ये पाणी पुरवठा हा सुरळीत होईल असे सांगितले.