केडगाव हत्याकांडातील ‘तो’ शार्पशूटर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला दाखल

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – केडगाव हत्याकांडातील गोळ्या झाडणारा शार्पशूटर संदीप रायचंद गुंजाळ हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला पोलीस बंदोबस्तात नगरला दाखल झाला आहे. रात्री त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहातून नगरला आणण्यात आले.
7 एप्रिल 2018 रोजी केडगाव येथील पोटनिवडणुकीच्या वादातून संदीप गुंजाळ याने शिवसैनिक वसंत ठुबे व संजय कोतकर या दोघांना गावठी पिस्तुलातून गोळ्या घातल्या. त्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तेव्हापासून संदीप गुंजाळ हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेस बसण्यास परवानगी मिळावी, यासाठी गुंजाळ याने कारागृहातून न्यायालयाकडे अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात सदर अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने गुंजाळ याला लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास परवानगी दिली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी गुंजाळ याला कोतवाली पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. आज सकाळी रूपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल या परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तात नेले.
परीक्षा झाल्यानंतर त्याला पुन्हा आज सायंकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार आहे. गुंजाळ हा केडगाव उपनगरात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका चालवत होता. तसेच तो स्वतःही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असतानाच त्याने केडगाव येथे दोघांवर गोळीबार करून हत्या केली होती. या गुन्ह्याचा तपास सीआयडी मार्फत सुरू आहे. या गुन्ह्यात माजी महापौर संदीप कोतकर, आ. कर्डिले यांची मुलगी व संदीपची पत्नी सुवर्णा कोतकर हेही आरोपी आहेत.