राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवा, राज्यपालांच्या प्रशासनाला सूचना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष ठेवा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. या लढाईत आव्हानात्मक परिस्थितीत काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीसांचे त्यांनी कौतुक केले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी राज्यपालांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यानंतर विषाणू फैलावास प्रतिबंध करण्याबद्दल शासकीय स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाविरुद्ध लढ्यात राज्य सरकारने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र निजामुद्दीन येथे मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरूकता ठेवावी, तसेच कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या.

देशातील कोरानाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राष्ट्रपतीही नियमितपणे राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यादृष्टीने राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या आणि सद्य:स्थिती, शासन करीत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धता, स्थलांतरित कामगार, मजूर आणि बेघर यांच्यासाठी केलेली निवारा व भोजनव्यवस्था, शेतमाल विक्रीसाठी केलेल्या उपाययोजना, मदतकार्यात अशासकीय संस्थांचा सहभाग इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. स्थलांतरित कामगार, मजूर आणि बेघर लोकांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वाना भोजन, औषधे देण्याबरोबरच तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या.

You might also like