दिल्लीकरांनी मतदानातून दाखवून दिलं, केजरीवाल हे ‘देशद्रोही’ नसून कट्टर ‘देशभक्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी म्हटले की, दिल्लीकरांची सेवा केल्याने आज जनतेनं आपल्या मुलाला निवडून दिलं. भाजपाने जरी सत्ता, पैसा आणि दिग्गज मंत्र्यांची फौज दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरवली असेल तरीही काम करणाऱ्याचाच विजय होतो, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले.

दिल्ली विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्याचे जवळपास स्पष्टच झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय सिंह हे दिल्लीच्या जनतेला संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले की हा जनतेचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेनं हे दाखवून दिलं की त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे. तसेच त्यांनी दिल्लीकरांचे आभार देखील मानले. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाता नाव न घेता केजरीवालांना देशद्रोही असे म्हटले होते. आणि मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहाविरोधात मतदान करण्याचे आवाहन देखील जनतेला केले होते. त्यानुसार आता दिल्लीतील जनतेने मतदानातून हे दाखवून दिले की मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे.

जर या निवडणुकीत आप चा विजय झाला तर सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीत स्थापन होणार आहे. दरम्यान मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, दिल्लीत चांगले काम केल्याने आप चा विजय निश्चित आहे. कारण गेल्या ५ वर्षात जनतेसाठी भरमसाठ कामं केली आहेत आणि ते निकालातून जनता समोर आणून देईलच. या निवडणुकीत आप च्या जवळपास दिग्गजांनी विजयाची आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी हे सर्व नेते निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपाचे आशीष सूद, विजेंदर गुप्ता, तेजिंदरपाल बग्गा, अरविंदरसिंह लवली, अलका लांबा, कृष्णा तीरथ असे काही महत्त्वाचे नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.