Valentine week मध्ये I Love You म्हणून केजरीवालांनी मानले दिल्लीच्या जनतेचे ‘आभार’, मंचावर दिसले नाहीत सिसोदिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पार्टीला पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले आहेत. आपचा विजय जवळपास स्पष्ट झाल्यानंतर केजरीवाल यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी केजरीवाल यांनी प्रथम भारत माता की जय आणि इन्कलाब झिंदाबाद, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

हे नवे राजकारण देशासाठी शुभसंदेश देणारे
केजरीवाल म्हणाले, दिल्लीच्या लोकांनी आज एका नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. याचे नाव आहे कामाचे राजकारण. दिल्लीच्या लोकांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, मत त्यांना जे मोहल्ला क्लिनिक बनवणार, मत त्यांनाच जे स्वस्त वीज देणार, घराघरात पाणी देणार. आमच्या परिसरात रस्ते बनवणार. हे नव्या पद्धतीचे राजकारण आहे आणि देशासाठी शुभसंदेश आहे. हा केवळ दिल्लीचा विजय नाही तर भारतमातेचा विजय आहे, हा संपूर्ण देशाचा विजय आहे.



आज हनुमानजींचा दिवस

अरविंद केजरीवाल हे मतदानापूर्वी हनुमान मंदिरात गेल्याने भाजपावाल्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता निकाल लागल्यानंतर प्रत्युत्तर देताना केजरीवाल म्हणाले, आज भगवान हनुमानाचा दिवस आहे. ज्यांनी दिल्लीच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे. आम्ही प्रार्थना करतो की हनुमानजी आम्हाला योग्य रस्ता दाखवतील, जेणेकरून आम्ही पाच वर्ष लोकांची सेवा करत राहू. आम्ही दिल्लीवाले देवाकडे इच्छा व्यक्त करतो की, आम्हाला शक्ती द्या, ज्याप्रमाणे मागील वर्षात दिल्लीची सेवा केली तशीच आम्ही दोन करोड लोक मिळून पुढील पाच वर्ष एक चांगली दिल्ली बनवू.

आज केजरीवाल यांच्या पत्नीचा वाढदिवस
अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानताना म्हटले, सर्वांनी रात्रंदिवस मेहनत केली. माझ्या कुटुंबानेही खुप मेहनत केली. आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे.