गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवालांचे ट्विट चर्चेत, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला देखील निवडणुकीत चांगल यश मिळाले आहे. यामुळे निकालानंतर केजरीवाल यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून गुजरातमधील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी गुजरातच्या लोकांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर आदी महापालिकेत भाजपने विजयी घौडदौड घेतली आहे. तर, सुरतमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकले आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत 119 जागांचे कल समोर आले असून त्यात भाजपने 101 जागांवर आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे. बडोदा महापालिकेत 76 पैकी 53 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ 7 जागाच जाताना दिसत आहेत. सूरतमध्ये आतापर्यंत 120 जागांपैकी 64 जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपा 51 तर आप 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्ष येथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील 72 पैकी 52 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे.