अहमदाबादमध्ये 13 KM च्या भव्य ‘रोड शो’चं आयोजन, लोक म्हणणार – ‘केम छो ट्रम्प’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार असून अहमदाबादमध्ये आयोजित एका भव्य-दिव्य रोड शोमध्ये ते सहभागी होणार आहेत. हा रोड शो तब्बल 13 किलोमीटर इतका असणार आहे. ट्रम्प हे पीएम मोदींसमवेत साबरमती आश्रमाला देखील भेट देणार आहेत. तसेच सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडिअमचे उद्घाटन देखील या दरम्यान करण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्या या भेटीमुळे आपल्याला अत्यानंद होत आहे असे म्हटलं आहे.

24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमध्ये येणार आहेत. ते सर्वप्रथम एअरपोर्टहून साबरमतीच्या गांधी आश्रमात दाखल होणार आहेत. यानंतर ते याच रस्त्यानं परत एअरपोर्ट सर्कल ते इंदिरा ब्रिज असा प्रवास करत असतानाच कोटेश्वर महादेव मंदिर आणि तिथून मेगीबा सर्कलहून मोटेरा स्टेडियममध्ये पोहचतील. विशेष म्हणजे हा संपूर्ण व्हीआयपी रस्ता बनवण्यासाठी तब्बल 2.13 कोटींच्या खर्चाचा अंदाज आहे.

या भेटीदरम्यान ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांना गुजरात सरकारकडून गुजराती संस्कृती आणि कलाकुसरीच्या नमुन्यांची भेट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या भेटीमुळे गुजरात विधानसभेचा अर्थसंकल्प 24 ऐवजी 26 फेब्रुवारी सादर केला जाणार आहे.