केनियाच्या खासदाराने सादर केली औरंगाबाद विद्यापीठाची बोगस पदवी

औरंगाबाद: पोलिसनामा ऑनलाईन

केनियाच्या एका खासदाराने २००१ मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (बामू) बोगस पदवी सादर केली होती. ही बोगस पदवी सादर केल्याप्रकरणी केनियाच्या एका खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. फ्रँकलिन मिथिका लिनतुरी असे या खासदाराचे नाव आहे.

२०१६ मध्ये नॅशनल अलाइन्स पक्षाच्या उमेदवारीवर मेरू इयंबे शहरातील दक्षिण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती. निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या पदवीवर त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतला होता. त्याआधारे या प्रकरणाच्या तपासाचे काम इंटरपोलकडे सोपवण्यात आले. तपासाअंती त्यांना विद्यापीठाने पदवी बहाल केलेली नाही, असा जबाब विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे शाखेकडे नोंदवला आहे. फ्रँकलिन यांनी २००१ मध्ये विद्यापीठाच्या बहिःस्थ बी.कॉम अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. त्यासाठी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात अर्ज भरला होता.