Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसचा दुसरा रुग्ण केरळमध्ये आढळल्याने देशभरात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करोना व्हायरसची लागण झाल्याचा दुसरा रुग्ण केरळमध्ये आढळला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाला लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्याचे जाहीर केले आहे.  आरोग्य मंत्रालयाने याबाबतची पुष्टी दिली असून करोनाची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

यापूर्वी चीनमधील वुहान येथून आलेल्या एका युवतीला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. वैद्यकीय शिक्षणासाठी ही युवती वुहान विद्यापीठात होती. तेथून ती गेल्या आठवड्यात केरळमधील थिसुर जिल्ह्यात परत आली होती. त्यावेळी तिच्यात संशयास्पद आजार आढळल्याने तिची रक्ताची चाचणी करण्यात आली. तेव्हा तिला करोना विषाणुची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्यावर वेगळ्या वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर आता दुसरी केसही केरळमध्ये आढळून आली आहे.

दरम्यान, वुहान शहरात अडकलेल्या ३२४ भारतीयांना एअर इंडियाने शनिवारी भारतात परत आणले असून त्यातील कोणालाही करोना विषाणुची बाधा झाली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच रविवारी आणखी ३२३ जणांना एअर इंडियाच्या विमानात भारतात आणण्यात आले आहे. त्यात मालदीवच्या ७ जणांचा समावेश आहे.