गर्भवती हत्तीणीच्या प्रकरणामुळे राज्याच्या बदनामीचे दु:ख : CM पिनराई विजयन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फटाकेयुक्त अननस खाल्ल्यामुळे गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये याच्या बातम्या यायला लागल्यानंतर, नेटकर्‍यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला. केरळ पोलीस आणि वन-विभागाने या प्रकरणी पावले उचलत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्तीणीच्या मारेकर्‍यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी पोलीसांनी 3 संशयितांवर काम करत असून, हत्तीणीच्या मारेकर्‍यांना शिक्षा देण्यासाठी जे काही करावे लागेल ते सरकार करेल असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

हत्तीणीला जंगल सोडून गावात येऊन हे फळ का खावे लागले याचाही तपास करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणावरुन सोशल मीडियावर केरळ सरकारच्या होणार्‍या बदनामीविरोधात विजयन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा आधार घेऊन काही लोक केरळ सरकार आणि जनतेविरोधात गरळ ओकत आहेत, हे पाहून मला दुःख झाले आहे. केरळमधील जनतेने नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. अपुरी माहिती आणि अर्धसत्याच्या आधारावर सरकारविरोधात अजेंडा राबवण्याचे काम सुरु आहे.

काही घटकांकडून या दरम्यान चुकीचा पायंडाही पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. केरळ वन-विभागाचे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे हत्तीणीवर झालेल्या अत्याचाराची गोष्ट सर्वात प्रथम प्रसारमाध्यमांसमोर आली. यानंतर सोशल मीडियावर या घटनेविरोधात संताप व्यक्त होऊ लागला. अनेक सेलिब्रेटींनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. केंद्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली गेल्यामुळे अखेरीस केरळ सरकारने या प्रकरणात मारेकर्‍यांविरोधातला तपास जलद गतीने करायला सुरुवात केली आहे.