चक्क घराच्या छप्परावर चढून ‘ती’ करतेय BA चा अभ्यास

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी, विद्यापिठांनी ऑनलाइन क्लासेस आणि लेक्चर्सची सुरुवात केली आहे. मात्र अनेक भागांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणि रेंज मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. इंटरनेट नसणे किंवा इतर तांत्रिक कारणे देत काहीजण अशा ऑनलाइन क्लासलाही दांडी मारत असतानाच केरळमधील एक विद्यार्थी मात्र ऑनलाइन क्लासला हजेरी लावण्यासाठी चक्क कौलारु घराच्या छप्परावर बसत अभ्यास करीत आहे. नमिथा नारायणन् असे विद्यार्थिनीचे नाव आहे.

नमिथा बीएच्या शेवटच्या वर्षाला असून पाचव्या सेमिस्टरचा अभ्यास करत आहे. कॉलेजने ऑनलाइन माध्यमातून लेक्चर घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र तिच्या घरामध्ये मोबाइल इंटरनेटला रेंज येत नसल्याने ऑनलाइन लेक्चर पाहताना खूपच अडचणी येतात. त्यामुळेच रेंज मिळण्याची जागा शोधत शोधत नमिथा थेट घराच्या छप्पारावर जाऊन बसली. सध्या ती तिथूनच लेक्चरला हजेरी लावते. नमिथाने दोन दिवस घरामध्ये कोणत्या ठिकाणी मोबाइलला रेंज मिळेल याची चाचपणी केली होती.

मात्र काही केल्या तिल्या इंटरनेटवर विनाअडथळा लेक्चर पाहता येईल इतकी रेंज मिळत नव्हती. अखेर घरातील टीव्ही अँण्टीनाला जिथे रेंज येते तिथूनच थोड्या अंतरावर मोबाइलला पूर्ण रेंज असते असे तिच्या लक्षात आले. आणि तिने तिथूनच लेक्चरला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. आता ती शेजार्‍यांची आणि आजूबाजूच्या लोकांची चिंता न करता वही पेन आणि मोबाइल घेऊन छप्परावर बसूनच अभ्यास करत आहे.

पाऊस आणि सूर्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तिने छत्रीचा आधार घेतला आहे. ती तासन् तास छप्परावर बसून मोबाइलवर ऑनलाइन अभ्यासावर लक्ष केंदृीत करीत आहे. तिने केवळ शिक्षणाकडे लक्ष द्यावे यासाठी पालकांनी तिला छप्परावर चढता यावे म्हणून लोखंडाच्या शिडीचीही व्यवस्था केली होती. त्याआधी त्यांनी या भागामध्ये सेवा पुरवणार्‍या सर्व्हिस प्रोव्हाडरलाही येथील रेंजसंदर्भात तक्रार केली होती मात्र त्याचा काहीही फायदा झाला नव्हता.