केरळ सोने तस्करी प्रकरणात CM आणि स्पीकरचे नाव आले समोर, स्वप्ना सुरेशने केले खळबळजनक आरोप

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीपूर्वी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. कारागृहात असलेली सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने आरोप केला आहे की, डॉलर तस्करी प्रकरणात मुख्यमंत्री विजयन, विधानसभा स्पीकर पी. श्रीरामकृष्णन आणि काही मंत्र्यांसह संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या वाणिज्य दूतावासाचे काही कर्मचारी सुद्धा सहभागी होते. प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीमा शुल्क विभागाने केरळ हायकोर्टात शुक्रवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा केला आहे. दरम्यान, माकपाने सीमाशुल्क विभाग मोदी सरकारचे निवडणुकीचे साधन बनल्याचा आरोप केला असून याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री आणि विधानसभा स्पीकरवर आरोप
सीमा शुल्क विभागाने म्हटले की, स्वप्ना सुरेशने सीआरपीसीचे कलम 108 आणि 164 च्या अंतर्गत दाखल केलेल्या जबाबात वरील आरोप केले आहेत. सीमा शुल्क (प्रतिबंध) आयुक्त सुमीत कुमार यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा करण्यात आला आहे की, असे सांगितले जात आहे की, कलम 108 आणि कलम 164 च्या अंतर्गत देण्यात आलेल्या जबाबात स्वप्नाने मुख्यमंत्री, केरळ विधानसभेचे स्पीकर आणि राज्य कॅबिनेटच्या काही सदस्यांच्याविरूद्ध धक्कादायक माहिती उघड केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाली तस्करी
स्वप्नाने आरोप केला आहे की, यूएईच्या माजी महावाणिज्य दूताचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते आणि जबाब दिला आहे की, अवैध व्यवहार झाला होता. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वाणिज्य दूतावासाच्या मदतीने मुख्यमंत्री आणि स्पीकरच्या इशार्‍यावर परदेशी चलनाची तस्करी झाली.

1.30 कोटी रूपयांचे तस्करी प्रकरण
डॉलर प्रकरण तिरुअनंतपुरममध्ये यूएईच्या वाणिज्य दूतावासाचे माजी वित्त प्रमुखद्वारे ओमानच्या मस्कतमध्ये 1.90 लाख डॉलर (जवळपास 1.30 कोटी रुपये) च्या कथित तस्करीशी संबंधीत आहे. सोने तस्करी प्रकरणात आरोपी स्वप्ना सुरेश आणि सह-आरोपी सरित पीएस कथित प्रकारे डॉलर तस्करी प्रकरणात सुद्धा सहभागी होते आणि सीमा शुल्क विभागाने त्यांना अगोदरच अटक केली आहे.

बड्या अधिकार्‍यांशी निकट संबंधाचा दावा
एजन्सीकडून दाखल प्रतिज्ञापत्रात हा सुद्धा दावा करण्यात आला आहे की, स्वप्नाने आपल्या जबाबात मुख्यमंत्री विजयन, त्याचे मुख्य सचिव आणि खासगी सिचवांचा जवळचा संबंध असल्याचा सुद्धा दावा केला आहे. सीमा शुल्क विभागाने हे प्रतिज्ञापत्र अतिरिक्त मुख्य न्यायलयीन मॅजिस्ट्रेट (आर्थिक गुन्हे) न्यायालयाच्या आदेशात काही टिप्पणींना आव्हान देणार्‍या राज्य सरकारच्या उत्तरादाखल सादर केले आहे.

स्वप्नाला सुरक्षा देण्याचा आदेश
न्यायालयाने तिरुअनंतपुरमच्या महिला कारागृहात बंद स्वप्ना सुरेशला सुरक्षा देण्याचा आदेश सुद्धा दिला होता. सुरेशने मजिस्ट्रेटच्या समोर दिलेल्या जबाबात आरोप केला होता की, जेलमध्ये तिला धमकावले जात आहे आणि तस्करी प्रकरणात सहभागी मोठ्या लोकांची नावे दिल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली जात आहे.

माकपाचा केंद्र सरकारवर हल्ला
केरळातील सत्ताधारी माकपाने याप्रकरणी मोदी सरकारवर हल्ला केला आहे. पार्टीने सीमा शुल्क आयुक्तालयावर निशाणा साधत म्हटले की, तपास एजन्सी इतकी खाली घसरली आहे की, भाजपाच्या हातातील निवडणुकीचे साधन बनली आहे. माकपाने याच्याविरूद्ध आंदोलन करण्याची सुद्धा घोषणा केली आहे.