केरळमध्ये पोलिस स्टेशनसमोर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ‘बीफ-करी’चं वाटप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये पुन्हा एकदा बीफ पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे. वास्तविक, राज्यातील पोलिस प्रशिक्षणार्थींच्या मेन्यूमधून बीफ हटविल्याची बातमी आली होती. यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी कोझिकोड येथील मुकक्म पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली आणि बीफ करी-ब्रेडचे वाटप केले. केरळ प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे (केपीसीसी) सचिव के. प्रवीण कुमार यांनी बीफ करी-ब्रेड वाटप करण्याची मोहीम सुरू केली.

के. प्रवीण कुमार म्हणतात की, यावरून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असणारा कल दिसून येतो. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांच्याशी ताळमेळ साधत लोकनाथ बेहेरा यांना पोलिस महासंचालक (डीजीपी) केले.

तसेच गुजरात दंगली प्रकरणात लोकनाथ बेहेरा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना क्लीन चिट दिली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पिनाराई संघाचा अजेंडा राबवत आहेत. कॉंग्रेस राज्यभर पिनाराईंचा दुटप्पीपणा उघड करेल. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला केरळ पोलिस विभागाने म्हटले आहे की, नव्या प्रशिक्षित पोलिस तुकडीसाठी मेनूच्या सेटमधून बीफ काढला गेला नाही.

केरळ पोलिसांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, मेस समितीच्या निर्णयानुसार ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी यांचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे, त्यांना आपापल्या भागात उपलब्ध असलेल्या अन्नासह निरोगी अन्न तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना आहाराद्वारे आवश्यक ऊर्जा मिळविणे हा त्याचा हेतू आहे.