अर्धनग्न होवुन रेहाना फातिमानं स्वतःच्या मुलांना करू दिलं बॉडी पेंटिंग, FIR दाखल

कोट्टयम : वृत्तसंस्था – केरळच्या शबरीमालामध्ये अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी चर्चेत आलेली महिला कार्यकर्ती रेहाना फातिमा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. तिने शेअर केलेल्या अर्धनग्न व्हिडीओमुळे पुन्हा एकदा फातिमाचे नाव चर्चेत आले आहे. तिच्या मुलांसमोर अर्धनग्न होत त्यांना स्वत:च्या शरिरावर पेंटिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रेहाना विरोधात थिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे.

रेहाना फातिमाने हा व्हिडीओ शेअर करताना ’बॉडी आर्ट आणि राजकारण’ कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिची दोन्ही मुले तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटिंग करत आहेत. पोस्टबाबत फातिमाचे असे म्हणणे आहे की, लैंगिकतेच्या चुकीच्या संकल्पनेविरोधात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये , ’जेव्हा त्यांची आई डोळ्याच्या समस्येमुळे काहीसा आराम करत होती, त्यावेळी तिच्या मुलांनी तिला बनवण्याठी फिनिक्स पक्षाचे पेंटिग करण्याचा निर्णय घेतला.’ सध्याच्या समाजात महिला कपड्यांमध्ये देखील सुरक्षित नाही आहेत. एखाद्या स्त्रीचे शरीर काय आहे किंवा लैंगिकता काय आहे याबाबत उघडपणे बोलले पाहिजे असे म्हणणे रेहानाने या व्हिडीओतून मांडले आहे. लैंगिकतेबाबत चुकीच्या संकल्पनांविरोधात घरापासूनच सुरुवात झाली तर बदल होऊ शकतो. दरम्यान रेहानाच्या हा व्हिडीओवर खूप टीका केली जात आहे.