विविध स्पर्धा-कार्यक्रमांद्वारे संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन (नितीन साके, शिवकुमार चन्नगिरे) – पुण्यातील मानाच्या गणपतींमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा गणपती ठरतो. हा संपूर्ण गणेशोत्सव केसरी-मराठा ट्रस्टच्या माध्यमातून पार पडला जात असून त्यासाठी वर्गणी जमा केली जात नाही. समाजप्रबोधनाला या उत्सवात नेहमीच प्राधान्य दिले जाते. केसरीचे कार्यकारी संपादक निखिल गडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ध्वनीवर्धकाचे निर्बंध नव्हते तोपर्यंत या उत्सवाचे २ भाग असत – संध्याकाळच्या वेळी ज्ञानसत्र होत असे आणि त्यानंतर रात्री करमणुकीचे कार्यक्रम असत. परंतु निर्बंधांमुळे यात काही मर्यादा आल्या असून कार्यक्रम वेळेत पार पाडणे गरजेचे असल्याने यात बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात दिवसभर महिला- मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जातात ज्यात जनतेचा मोठा सहभाग असतो. जाणून घेऊयात या गणेशोत्सवाबद्दल आणि यातील विविध स्पर्धा – कार्यक्रमांबद्दल.

मूर्तीचे वैशिष्ट्य :
केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात असल्याने तेथेच याची स्थापना करण्यात आली. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथ होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. तेव्हापासून ज्ञानेश्‍वरीमधील वर्णनाप्रमाणे काटेकोरपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने दरवर्षी नवीन मूर्ती तयार करवून घेतली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जित होते.

प्रतिष्ठापना :

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पारंपरिक लाकडी पालखीत विराजमान होऊन वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. बिडवे बंधूंच्या सनईवादनासहित श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांनी वादन केले. दुपारी १२:३० वाजता “केसरी’चे विश्‍वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. सकाळी १० वाजता सुरु झालेली ही मिरवणूक नारायण पेठेतील मणिकेश्वर विष्णू चौक- उंबऱ्या गणपती चौक- शेडगे विठोबा चौक- माती गणपती मंदिर- केसरीवाडा अशी पार पडली. १८९४ साली लोकमान्य टिळकांच्या हस्ते प्रथम स्थापना झालेल्या या गणपतीचे हे १२६ वे वर्ष आहे.

पूर्ण १० दिवस होणारे करमणुकीचे कार्यक्रम :

निखळ करमणूक समाजाला देणे हे या करमणुकीच्या कार्यक्रमांमागचा मूळ हेतू असल्याचे निखिल गडकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यातून आम्ही लोकमान्य टिळकांचे उद्दिष्ट असणारे राष्ट्रीय शिक्षण समाजाला देण्याचाही प्रयत्न करत असतो असेही यांनी सांगितले. १० दिवस चालणारे हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील.

१. सोमवार (२ सप्टेंबर ) – संध्या ६ वाजता ‘गीता रहस्यातून दिसणारा लोकमान्यांचा राष्ट्रवाद’ या विषयावर डॉ मुकुंद दातार यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर ७ वाजता ‘गोफ स्वरांचा’ हा गायन वादनाचा कार्यक्रम माधुरी करंबळेकर आणि सहकलाकारांनी सादर केला.

२. मंगळवार (३ सप्टेंबर ) – ‘रसिक मोहनी’ हा नृत्य, गायन आणि वाद्य वादनाचा कार्यक्रम अंजली सिंगडे-राव आणि सहकलाकारांनी सादर केला.

३. बुधवार (४ सप्टेंबर) – तेजस्विनी साठे आणि सहकलाकारांनी कथक नुत्यविष्कार हा कार्यक्रम केला आणि त्यानंतर आस्था कार्लेकर आणि सहकलाकारांचा ‘नारी शक्ती’ हा हा नृत्य-नाट्य अविष्काराचा कार्यक्रम झाला.

४. गुरुवार (५ सप्टेंबर) – ‘झी मराठी’ वरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील कलाकारांनी याठिकाणी हजेरी लावली ज्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम राजेश दामले यांनी घेतला.

५. शुक्रवार (६ सप्टेंबर) – स्वप्नील रास्ते यांच्या कल्पनेतून ‘फन मस्ती विथ आरजे’ हा कार्यक्रम होणार आहे ज्यासाठी रेडिओ चॅनलवरील विविध रेडिओ जॉकी (आरजे- बंड्या, केदार, इरा, श्रुती, श्रीकांत इ. ) उपस्थित असतील.

६. शनिवार (७ सप्टेंबर ) – नजराणा हा हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम अली हुसेन, पल्लवी जोशी, राधिका अत्रे इत्यादी नामवंत कलाकार सादर करतील.

७. रविवार (८ सप्टेंबर ) – अंगद गायकवाड यांचा ‘अंतरंगीचे नाद विश्व्’ हा कार्यक्रम सादर होईल. यासाठी झी सारेगम आणि संगीत सम्राट विजेत्या कु. अंजली गायकवाड आणि कु. नंदिनी गायकवाड, अंगद गायकवाड आणि सहकलाकार उपस्थित असतील.

८. सोमवार (९ सप्टेंबर ) – संगीतकार, गायक व दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची मुलाखत मुलाखतकार राजेश दामले घेतील.

९. मंगळवार (१० सप्टेंबर ) – ‘मंगेशकर मेस्ट्रोज- मा. दीनानाथ ते पंडित हृदयनाथ’ हा मराठी गितांच्या दृक्श्राव्य मैफलीचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी डॉ. गौरी दामले, डॉ. देविका दामले, डॉ. मोहिका दामले आणि चैतन्य कुलकर्णी उपस्थित असतील.

शालेय मुलांसाठी स्पर्धा :

१. चित्रकला स्पर्धा – दरवर्षीप्रमाणे शालेय मुलांना विविध गटांमध्ये विभागून त्यांच्या चित्रकला स्पर्धा १८ ऑगस्ट, २५ ऑगस्ट, आणि १ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या.

२. क्ले मॉडेलिंग स्पर्धा – १ली ते ३री आणि ४थी ते ७वी अशा दोन गटांत या स्पर्धा २५ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या.

३. फॅन्सी ड्रेस स्पर्धा – बालवाडी ते ३री च्या विध्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या.

महिला/ पुरुषांसाठी स्पर्धा :

१. पुष्परचना / फुलांची रांगोळी स्पर्धा – ही स्पर्धा ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत घेण्यात आली.

२ पाककृती स्पर्धा : ही स्पर्धा ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत घेण्यात आली.

३. फळे / भाज्या डेकोरेशन स्पर्धा : रविवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० तर १२ या वेळेत ही स्पर्धा घेतली जाईल.

वरील सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ एकाच वेळी म्हणजे ८ सप्टेंबर २०१९ रोजी लोकमान्य सभागृह येथे संपन्न होणार आहे.

विसर्जन मिरवणूक :

अनंत चाथूर्दशीला गुरुवार दि १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रींची मिरवणूक सुरु होईल. याचा मिरवणूक मार्ग दरवर्षीप्रमाणे मंडई- समाधान चौक – लक्ष्मी रोड यामार्गे नेला जाईल. वाजत गाजत होणाऱ्या या मिरवणुकीसाठी श्रीराम आणि शिवमुद्रा ही दोन पथके वादन करतील. कायद्याच्या बंधनाप्रमाणे सर्व नियम पाळून वेळेत मिरवणूक संपवली जाईल असे केसरी-मराठा ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.