फलंदाजाने षटकार ठोकत फोडली स्वतःच्याच गाडीची काच

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आयर्लंडचा केविन ओब्रायन फलंदाजांपैकी एकास्थानिक टी-20 सामन्यात खेळत असताना त्याने नेहमीच्या लौकिकाला साजेसा खेळ करत 37 चेंडूत 82 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत 8 षटकारांचा समावेश होता. मात्र दुर्दैवाने या स्फोटक खेळीचा फटका खुद्द ओब्रायनलाच बसला आहे. त्याने मारलेला एक षटकार चक्क स्टेडीअमबाहेर जाऊन त्याच्या स्वतःच्या गाडीच्या काचेवर जाऊन आदळला. क्रिकेट आयर्लंडने ओब्रायनच्या गाडीचा फोटो ट्विटर टाकत याबद्दल माहिती दिली आहे.

लेनस्टर लाईटनिंग विरुद्ध नॉर्थ-वेस्ट वॉरियर्स या सामन्यात ओब्रायन लाईटनिंग संघाकडून खेळत होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना बर्‍याचदा मध्ये थांबवावा लागला. अखेरीस लाईटनिंग संघाने या सामन्यात 24 धावांनी विजय मिळवला. मारलेल्या फटक्यामुळे आपल्या गाडीची काच फुटल्याचे लक्षात घेताच ओब्रायनची धावपळ उडाली.

या सामन्यासाठी ओब्रायनने गाडी ही झाडाच्या सावलीखाली पार्क केली होती. परंतू ओब्रायनने खेळलेला फटका इतका जोरदार होता की चेंडू झाडाच्या फांद्यांमधून जाऊन थेट त्याच्या गाडीवर आदळला. याआधीही ओब्रायनने जोरात फटका मारत मैदानाबाहेर उभ्या असलेल्या गाडीची काच फोडली होती.