झोपलेल्या वडिलांना 3 बहिणींनी चाकू-हातोड्याने केले ठार, नंतर पोलिसांना केला फोन…

मॉस्को : वृत्तसंस्था – ही घटना रशियातील आहे. मॉस्कोतील राहत्या फ्लॅटमध्ये या बहिणींनी झोपलेल्या वडिलांची चाकू, हातोड्याने हत्या केली. त्या खचातुर्यन बहिणी म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर 30 वार होते. वडील या मुलींचा छळ करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

बीबीसी रिपोर्टनुसार, 3 वर्षांपासून वडील या मुलींना मारहाण करत होते, टॉर्चर करत होते, कैद्यांप्रमाणे ठेवत होते आणि लैंगिक छळसुद्धा करत होते. घटनेच्यावेळी मारिया 17 वर्षांची, अँजेलिना 18 आणि क्रिस्टिना 19 वर्षांची होती. तिघींनी 27 जुलै 2018 ला वडिलांची हत्या केली होती.

वडील मुलींना त्यांच्या आईला भेटू देत नव्हते. कौटुंबिक हिंसेचे पुरावे असतानाही तीनही बहिणींवर हत्येचा आरोप लावला आहे. यामुळे या प्रकरणात रशियात वादविवाद सुरू आहे. तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी कॅम्पेनमध्ये सहभागी होत त्यांना सोडण्याची मागणी केली. मानवाधिकार संघटनांनी या बहिणींना गुन्हेगार नव्हे, तर पीडित म्हटले आणि रशियन कायद्यात बदलाची मागणी केली होती. 27 जुलैला 2018 फ्लॅट योग्यप्रकारे स्वच्छ का केला नाही म्हणून वडील तिघींना ओरडले होते. घटनेपूर्वी वडील मिखैल खचातुर्यन (वय 57 ) यांनी मुलींच्या चेहर्‍यावर मिरची पावडर टाकली होती. छळ आणि एकाकीपणामुळे त्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्टेसला तोंड देत होत्या.

आईने पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु पुरावे नसल्याने त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली नव्हती. या खटल्याची सुनावणी न्यायालयात अतिशय मंद गतीने सुरू आहे. या प्रकरणावरून रशियात अनेक आंदोलने झाली आणि या बहिणींना सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या त्यांना पत्रकारांशी बोलण्यासही प्रतिबंध आहे. हत्येचा आरोप सिद्ध झाल्यास तिघींना 20 वर्षांपर्यंत जेल होऊ शकते. तपासकर्त्यांनी आरोपी बहिणींवरील हत्येचा आरोप काढता येऊ शकतो, असे म्हटले होते. परंतु, अजून यावर कोणताही निर्णय झालेला नाही.