महिलेची पर्स घेऊन पसार झालेला रिक्षाचालक २४ तासाच्या आत जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षा प्रवासानंतर महिला रिक्षात पर्स ठेवून भाडे देत असताना पर्स घेऊन रिक्षासह पसार झालेल्या रिक्षालाचालकाला खडक पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पर्ससह पर्समधील सोन्याचे मंगळसुत्र रोख रक्कम असा १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खलिद अबुबकर शेख (वय ३९, रा. गणेशपेठ) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती दिनेश पाचारणे या त्यांच्या मामाच्या मुलांसह शुक्रवारी पुणे स्टेशन ते स्वारगेट दरम्यान प्रवास करत होत्या. त्यावेळी स्वारगेट येथे आल्यावर त्यांनी पर्स एका रिक्षात ठेवली आणि रिक्षाचालकाला सुटे पैसे देत होत्या. त्यावेळी रिक्षाचालकाने पर्स ठेवल्याचे पाहून पर्ससह रिक्षा घेऊन तो पसार झाला. त्यानंतर महिलेने खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.

तेव्हा खडक पोलिसांकडून तपास सुरु असताना पोलीस कर्मचारी महाविर दावणे आणि आशिष चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संबंधित रिक्षाचालक हा घोरपडे पेठेतील रिक्षास्टॅंडवर उभा आहे. त्यानुसार त्यांनी खलिद शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र आणि ८०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, कर्मचारी विनोद जाधव, संदिप पाटील, रवी लोखंडे, आशिष चव्हाण, महावीर दावणे, योगेश जाधव, विशाल जाधव, इम्रान नदाफ, सागर केकाण, हिम्मत होळकर, महिला कर्मचारी साधना समींदर व जयश्री पवार यांच्या पथकाने केली.