पुणेकरांसाठी खुशखबर ! खडकवासाला धरण 92.61 % भरलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरण सुमारे 92.61 टक्के भरले आहे. खडकवासला धरण लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. धरण शंभर टक्के भरल्यास मुठा नदीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

खडकवासला धरणाची क्षमता 1.83 टीएमसी आहे. आज खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याची शक्यता आहे. पुण्यातील चारही धरणांमध्ये 16.89 टीएमसी म्हणजेच 57.96 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या शंभर टक्क्यांच्या तुलनेत यंदाचा पाणी साठी कमी आहे. पानशेत धरणामध्ये 63.90 टक्के पाणी साठा, वरसगाव 53.43 आणि टेमघर धरणामध्ये 38.19 टक्के पाणी साठा आहे.

शुक्रवारी खडकवासाला धरणात 78 टक्के पाणीसाठा झाला होता. या धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे 300 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र, धरणक्षेत्रांत पावसाने उघडीप दिल्याने हा विसर्ग थांबवण्यात आला. खडकवासला धरण 100 टक्के भरल्यानंतर मुठा नदितून पाणी सोडण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात 1 जून पासून आजपर्यंत 769 मिलीमीटर पाऊस पडल्याने या धरणातील पाणीसाठा 48.56 टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 94.44 टक्के पाणी साठा होता.