Pune : खडकवासला धरण 100 % भरले

पोलिसनामा ऑनलाईन – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. धरणातून मुठा नदीपात्रात 1 हजार 712 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काल धरण 98 टक्के भरले होते. मात्र धरणक्षेत्रात सतत कोसळणार्‍या पावसामुळे आज सकाळी धरण 100 टक्के भरले आहे.

चारही धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे 19.41 टीएमसी आणि 66.58 इतके टक्के धरणे भरली आहेत. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने या धरणामध्ये 1.97 अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांपैकी टेमघर धरणात 1.70 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 7.51 टीएमसी, पानशेत धरणामध्ये 7.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठयामध्ये वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पाणी साठ्यात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे त्यामध्ये वाढ केली असून सध्या स्थितीला एक हजार 712 क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.