पुण्याला पुन्हा पुराचा धोका ? खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक पाणी सोडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रात्रभर सुरु असलेला धुवांधार पावसामुळे खडकवासला साखळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होऊ लागले असल्याने सकाळपासून खडकवासला धरणातून २२ हजार ८८० क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. त्यावेळी मुळशी धरणातूनही १० हजार क्युयेक पाणी सोडले जात आहे. दिवसभरात दोन्ही धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याने शहरातील मुठा नदीला पुन्हा पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे.

मंगळवारी रात्रीपासून शहर व परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत पानशेत ७१, वरसगाव ७०, टेमघर ८३, खडकवासला १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पानशेत, खडकवासला, वरसगाव धरण १०० टक्के भरली असून टेमघर ९० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. तेव्हा पानशेतमधून ९ हजार ८३४ क्युसेक आणि वरसगाव धरणातून ८ हजार ५३० क्युसेक पाणी सोडण्याची पाळी आली. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने व खडकवासला धरण पूर्ण भरले असल्याने पहाटे ५ वाजल्यापासून खडकवासला धरणातू २२ हजार ८८० क्युसेक पाणी नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. सकाळी ९ वाजता खडकवासला धरणातून सकाळी ९ वाजता २७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

मुळशी धरणाच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडण्यात येत होते. सकाळी ८ वाजता त्यात वाढ करुन १५ हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, सांगवी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे पाऊस अजून वाढल्यास धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला पुन्हा पूराचा धोका वाढला आहे.

पवना धरणातून ६ हजार क्युसेक –
पवना धरण १०० टक्के भरले असून पहाटे ४ वाजल्यापासून धरणातून पवना नदीत ६ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या तीनही धरणातून सोडण्यात येणारे पाणी तसेच धरणापुढील भागात पडत असलेला पाऊस यामुळे संगम पुलाजवळ मुळा मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –