एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ! फडणवीसांच्या सांगण्यावरूनच माझ्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर आता खडसेंनी त्यांना झालेला त्रास बोलून दाखवला आहे. इतकंच नाही तर त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. फडणवीसांवर नाराज असल्यानं पक्ष सोडत आहे अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी खडसे यांचा गळा दाटून आला. मुक्ताईनगरमध्ये ते पत्रकारांसोबत बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “भाजपवर किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर मी नाराज नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यामुळंच मी पक्ष सोडत आहे. मी येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) प्रवेश करणार आहे.”

तुमच्यासोबत किती आमदार किंवा खासदार आहेत असं विचारलं असता खडसे म्हणाले, माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार नाही. मी एकटाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपमध्ये राहणार आहेत. तसंच माझं चारित्र्यहनन करण्यापर्यंत काही जणांनी डाव आखल्याचं” सांगत खडसेंनी पडणवीसांवर निशाणा साधला.

खडसे म्हणाले, “एका महिलेनं विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरूद्ध केली होती. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माझ्यावर आरोप लावला. त्यानंतर सांताक्रूज पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला. या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथील पोलीस निरीक्षकांनीच मला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करायला सांगितलंय. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे जाऊन यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी ती महिला रात्रभर गोंधळ घालत होती त्यामुळं गुन्हा दाखल करायला लावला. पुन्हा मागे घेऊयात असं त्यांनी मला सांगितलं. या प्रकरणामुळं माझी खूप बदनामी झाली. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरद्ध राजकारण केलं गेलं. म्हणून मी पक्षात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला” असंही ते म्हणाले.