सांगलीत ड्रेनेज खोदाईने खराब रस्त्याचा बळी

सांगली ः पोलीसनामा ऑनलाईन
महापालिकेच्या ड्रेनेज योजनेसाठी ठिकठिकाणी खोदाई केल्यामुळे रस्ते खराब झाले आहेत.त्यात पावसाने दलदल झाली आहे. महापालिकेच्या अनास्थेने अनेक भागात  दुरवस्था झाली आहे. त्यामुळे  रुक्मिणीनगरात प्रकाश वसंतराव चरणकर (वय 65) यांचा शनिवारी बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनाद्वारे केला आहे.

 नागरिक राजू नलावडे म्हणाले, चरणकर यांना आज सकाळी  हृदयविकारचा झटका आला. त्यांना तत्काळ रुग्णालयात  नेणे आवश्यक होते. परंतु गुडघाभर दलदलीमुळे कसरत करून कसेबसे टेम्पो रिक्षातून न्यावे लागले. परंतु वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. वारंवार रस्त्याबाबत तक्रारी करूनही महापालिकेने रस्ता दुरवस्थेत ठेवूनच त्यांचा बळी घेतला आहे.

शहरात ड्रेनेज योजनेंतर्गत पाईपलाईन, चेंबर्सच्या कामासाठी शामरावनगर, कोल्हापूर रस्त्यावरील उपनगरे, रामकृष्ण परमहंस सोसायटी, धामणी रस्ता अशी अनेक ठिकाणी रस्ते खोदून  ठेवल आहेत. ही कामे होऊनही सहा महिने-वर्षभर या रस्त्यांचे पॅचवर्क, रस्तेकामे झाली नाहीत. त्यामुळे रस्ते खड्ड्यांत होते. शामरावनगरात आंदोलन झाले. नंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी जागेवर जाऊन पंचनामा केल्यानंतर मुरुमीकरणाचे काम सुरू झाले.

 परंतु रुक्मिणीनगर परिसरात कुठेही अद्याप मुरुम पडलेला नाही. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी केल्या. किमान रस्ते मुरुमाचे करण्याची मागणी केली. तरीही कामे झाली नाहीत. त्यातच गेले  दोन-तीन दिवस पाऊस झाला. त्यामुळे मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यांत गुडघाभर चिखल झाला आहे. त्या  दलदलीतून चालताही येत नाही. वाहने  दूरवर ठेवून घरी जावे लागते.

नलावडे म्हणाले, चरणकर  घरातच अचानक भोवळ येऊन ते कोसळले. त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे गरजेचे होते.  परंतु त्यांना घरातून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी रस्ताच नाही.  एक टेम्पोरिक्षाचालक यायला तयार झाला. ती गाडी दलदलीतून  ढकलत  रस्त्यापर्यंत नेली. मात्र  रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने चरणकर यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस महापालिकाच जबाबदार आहे.

ते म्हणाले, याप्रकरणी  आम्ही महापालिकेविरुद्ध मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करणार आहोत.  यावेळी सुधीर ढाले, प्रकाश जोशी, विश्‍वजित पाटील, सौरभ साळुंखे, अक्षय ठोंबरे, अमित जगदाळे, सचिन कदम, अमोल हिरवे, विक्रांत कोळी उपस्थित होते.