रत्नागिरीमध्ये शिवसेना आणखी ‘पावरफुल्ल’ झाली, भाजपला धक्का देत शशिकांत चव्हाण यांची सेनेत ‘एन्ट्री’

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असणारे शशिकांत चव्हाण यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.

शशिकांत चव्हाण यांची कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. अनेक वर्षे शिवसेना जिल्हाध्यक्ष म्हणून पद त्यांनी भूषवलं होतं. मात्र काही कारणाने त्यांनी शिवसेनेपासून दूर जात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपची उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोडी, मंडणगड, गुहागर, चिपळून या भागामध्ये मोठी ताकद वाढली होती. मात्र, चव्हाण यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने हा भाजपला धक्का असल्याचे बोलले जात आहेत. चव्हाण यांनी रामदास कदम यांच्या मुंबईतील निवास्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शशिकांत चव्हाण यांच्या शिवसेना प्रवेशाने आता उत्तर रत्नागिरी विेशेषत: दापोली-खेड विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. लवकरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा देखील आता सुरु झाली आहे. माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत.