Yavatmal News : 2 मुलींसह 4 विद्यार्थ्यांचं अपहरण करून लुटलं; ओळखीचे मित्र भेटल्यानं ‘अशी’ झाली सुटका

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शिकवणीच्या वर्गासाठी बाहेर पडलेल्या 4 मित्रमैत्रिणींचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर मुलींचा विनयभंग देखील झाला. सोमवारी हा प्रकार घडला. सदर विद्यार्थ्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे. अवधुतवाडी पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवाणी लेआऊट वाघापूरचा रहिवाशी 11 सायन्सचा विद्यार्थी कोल्हे लेआऊट येथील कोचिंग क्लासला जातो. तो दुपारी दीड वाजताच्या सुमारास एक मित्र आणि दोन मैत्रिणी यांच्यासह लोहारा एमआयडीसी परिसरात रस्त्यावर उभा होता. यावेळी दुचाकीवरून (गाडी नंबर- एम एच 31 बीटी 6333) चारजण आले. त्यांनी हातातल्या काठीनं मारहाण करीत त्याच्या दुचाकीची चावी आणि मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी रस्त्यालगत असणाऱ्या झुडपी जंगलात नेऊन त्यांना काठीनं मारायला सुरुवात केली. यानंतर दोन्ही मुलींना दाट झुडपात नेऊन त्यांची छेडछाड केली.

हा प्रकार सुरू असतानाच काही ओळखीचे मित्र तिथं आले. त्यांना आपबीती सांगताच त्या चारही आरोपींनी दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला. आरोपींनी मोबाईल आणि इतर असा एकूण 35 हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. अवधुतवाडी पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेतली आहे. पोलिसांनी भांदवि कलम 394, 363, 341, 354 (अ), 323, 506, 34 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 मधील सहकलम 8,12 नुसार 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच उविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.