कोल्हापूर : व्यापाऱ्याचे अपहरण करणारी टोळी जेरबंद

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

इचलकरंजी येथील गारमेंट व्यावसायिक रामकृष्ण रामप्रताप बाहेती (वय ४५) यांचे एका टोळीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पोलीसांच्या रात्रगस्तीची गाडी बघून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. यावेळी अपहरण करणारी टोळी पोलीसांना बघून पळून गेली. मात्र पोलीसांनी २४ तासांत या गुन्ह्यातील ८ जणांना ताब्यात घेतले आहे. एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरकरण्याचा या टोळीचा कट होता.

अक्षय श्रीकांत शिंदे (वय २७, रा. गुरुकन्‍नननगर), गौरव प्रकाश पोईपकर (वय २५), विकास आनंदा गोईलकर (२५, दोघे रा. घोडकेनगर), अतुल शिवाजी कामते (वय २५, रा. नदीवेस), शहारूख महामूद सनदे (वय २५, रा. आमणापूर, ता. पलूस, जि. सांगली), शक्‍ती धनाजी जाधव (वय २४), महेश संजय यादव (वय २७, दोघे रा. नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली), सुबोध राजकुमार शेडबाळे (वय २८, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) अशी नावे आहेत. त्यांच्याकडून अपहरणासाठी वापरलेली कार (एमएच १० बीए ६९८८) व दुचाकी (एमएच ०९ डीक्यू ४५) असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्‍त केला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, बाहेती हे मंगळवारी (दि.१२) रात्री सव्वाबाराच्या सुमारास नाकोडानगर येथून आपल्या घरी जात होते. दरम्यान, पाच जणांनी त्यांना मारहाण करुन शहापूर, कोरोची, हातकणंगले मार्गे पेठ वडगावला नेले. त्यांच्याकडील सोन्याची चेन, घड्याळ, मोबाईल, अंगठी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल काढून घेतला. यावेळी जीवे मारण्याची धमकी देऊन मुलाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान हातकणंगले पोलिसांची रात्रगस्तीची गाडी पाहून अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना वाटेतच सोडून पलायन केले होते. त्यानंतर बाहेती यांनी गावभाग पोलिसांना प्रकार सांगितला. पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र बनवले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण इचलकरंजी, गावभाग पोलिस यांची पथके शोधासाठी रवाना करण्यात आली. तसेच ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशनही तपासण्यात आले. अपहरणकर्ते शिरदवाड हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे तानाजी सावंत, गावभागचे निरीक्षक मनोहर रानमाळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अमोल माळी, सचिन पंडित, युवराज सूर्यवंशी, राम गोमारे, महेश कोरे आदींसह पथकाने ही कामगिरी केली आहे.