अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची १२ तासात सुटका ; आरोपी गजाआड 

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईन – देहूरोड बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाचा १२ तासात देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केले आहे.
काय आहे प्रकरण ? 
देहूरोड बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे सकाळी सातच्या सुमारास मोटारीतून आलेल्या चौघांनी अपहरण केले. या घटनेमुळे परिसरात आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. घटेनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. ईश्वर आगरवाल असे व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून देहूरोड येथील श्री नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मंदिरात देवपूजेसाठी जात असताना चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त जी. एस माडगूळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढच्या कामाला लागले.
आर्थिक वादातून केले अपहरण 
दरम्यान, हा आरोपी व्यापाऱ्याला घेऊन नाशिक कडे जात होता याचा सुगावा पोलिसांना लागला त्यानुसार पॊलिसांनी मोठ्या शिताफीने खेड येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता. हे अपहरण आर्थिक वादातून झाल्याचे पुढे येत आहे. आरोपीला अपहरणाचे कारण विचारल्यास त्याने संबंधित व्यापाऱ्याने माझे एक कोटी रुपये द्यायचे आहेत असे संगितले तर याच बाबतीत व्यापाऱ्याने आरोपीकडून १२ लाख रुपये घेतल्याचे संगीताले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. तरी १२ तासात या अपहरण प्रकरणाचा छडा लावल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त जी. एस माडगूळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचे कौतुक होत आहे.