गुजरात, राजस्थानमधील अपहरणकर्त्याला नागपूरात अटक; व्यापार्‍याचे अपहरण करुन उकळले होते 35 लाख

नागपूर : गुजरातच्या व्यापार्‍याचे अपहरण करुन त्याला राजस्थानात नेऊन ३५ लाखांची खंडणी वसुल करणार्‍या अपहरणकर्त्यांच्या म्होरक्याला नागपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. मनोजी नंदकिशोर व्यास (वय ३४, रा. रामगड, जि, शिखर) असे त्याचे नाव आहे. तो राजस्थानमधील हिस्ट्रिशिटर गुन्हेगार आहे.

मनोज व्यास याने आपल्या ४ साथीदारांसह गुजरातमधील गांधीधाम येथील टिंबर व्यापारी मुकेश अग्रवाल याचे १९ जानेवारी रोजी अपहरण केले. त्यांना राजस्थानमधील फतेपूर जिल्ह्यात नेले. तेथे त्यांना ओलीस ठेवून जीव मारण्याचा धाक दाखविला़ अग्रवाल यांच्या सुटकेसाठी नातेवाईकांकडून ३५ लाखांची खंडणी उकळली.

या अपहरण आणि खंडणी वसुलीने गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. दोन्ही राज्यातील पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी पथकेही सक्रीय झाली होती. गुजरात एटीएसने मनोज व्यास याच्या ४ साथीदारांना पकडले. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. गुजरात, राजस्थान पोलिसांना चकवा देऊन तो नागपूराला आला होता.

नागपूरमधील परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे आणि कच्छ – गांधीधामचे पोलीस अधीक्षक मयुर पाटील हे एकाच बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. पाटील यांनी डॉ. शिंदे यांना मनोज व्यासचे वर्णन आणि मोबाईल क्रमांक कळविला होता. शिंदे हे त्याचा पाठपुरावा करीत असतानाच मंगळवारी दुपारी व्यास याच्या मोबाईलचे लोकेशन नागपूरात दिसून आले. त्यामुळे संपूर्ण नागपूर पोलिसांची यंत्रणा सतर्क करण्यात आली. बेलतरोडीचे पोलीस अधिकारी विजय आकोत, विकास मनपिया, गोपाळ देशमुख, रमेश रुद्रकार, मनोज साहु आणि तेजराम देवढे यांनी जबलपूर -हैदराबाद महामार्गावर सापळा लावला. आय १० कारमधून आलेला मनोज व्यास अलगद या सापळ्यात अडकला. त्याच्याकडून २२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. गुजरातचे पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी येत आहेत़.