युवतीचे अपहरण करून चाकूने सपासप वार करून खूनाचा प्रयत्न, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमसंबंध तोडल्यानंतरही वारंवार लग्नाची मागणी करुन लग्नास नकार दिल्याने एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिला गंभीर जखमी करण्याची घटना हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (रा. रामटेकडी) आणि चंदन चव्हांडके (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना मुंढवा पुलापासून हडपसर मगरपट्टा सिटीदरम्यान गुरुवारी रात्री आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी वडकीनाका येथे राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी २०११ मध्ये रामटेकडी येथे रहायला असताना तिच्या घरासमोर राहणाऱ्या प्रसाद सोनवणे याच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. गेले ७ ते ८ वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान ही तरुणी आपल्या कुटुंबासह वडकीनाला येथे रहायला गेले. मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रसाद या तरुणीला लग्न करु म्हणून मागे लागला होता. किरकोळ कारणावरुन दारु पिऊन तो तिला मारहाणही करुन लागला. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले. तरीही तो तिला वारंवार फोन करीत. त्याचा फोन उचलला नाही तर तो मित्राच्या फोनवरुन फोन करुन तिला त्रास देत असे. ही तरुणी मुंढवा पुलाजवळ एका कंपनीत कामाला आहे. त्या ठिकाणी प्रसाद बाहेर येऊन थांबत असे.

८ ऑगस्टला ती सायंकाळी साडेसातला कामावरुन बाहेर पडल्यावर प्रसाद दोन मित्रासह बाहेर उभा होता. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसायला लावले. नदीम रिक्षा चालवत होता. रिक्षा हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमधील पॉवर हाऊसजवळ गेल्यावर त्याने पुन्हा तिला माझ्याबरोबर लग्न कर असा आग्रह केला. तिने नकार देताच त्याने आपल्याकडील चाकू काढून रिक्षातच तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले. तेव्हा तिने मला मारु नको, मी तुझ्याशी लग्न करते, तुझ्या पाया पडते, असे ओरडून सांगत असतानाही त्याने ‘तू माझ्याशी लग्न केले नाही तर तू जिवंत असेपर्यंत मी तुला त्रास देणार, तुला ठार करणार, तुझे कोठेही लग्न होऊ देणार नाही’, अशी धमकी देऊन तिला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेला. त्याचवेळी तिला तिच्या बहिणीचा फोन आला. प्रसादच्या आईने ती जखमी असल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच या तरुणीची बहिण प्रसादच्या घरी आली. तिने तिला हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात दाखल केले. मुंढवा पोलिसांनी तिघांवर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुन्हे शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून तिघांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –