रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने बालकाच्या अपहरणाचा कट फसला ; परप्रांतीय अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे ) – वडकी (ता. हवेली ) हद्दीतील अंगणात खेळत असणार्‍या मुलाला बिस्किटाचे आमिष दाखवून वडिलांनी बोलावले आहे, असे सांगून सहा वर्षीय मुलाचे अपहरण करणार्‍या अज्ञात व्यक्तीचा प्रयत्न रिक्षाचालकाने गुरुवारी (ता. २१ ) हाणून पाडला आहे.

श्रीनाथ राहुल मोडक (वय – ६ ) असे मुलाचे नाव आहे तर सलीम शेख असे रिक्षाचालकचे नाव आहे. याप्रकणी श्रीनाथचे वडील राहुल मोडक (रा. वडकी, ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात परप्रांतीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोडक हे वडकी परिसरात राहतात. गुरुवारी (ता. २१) श्रीनाथ शाळा सुटल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत होता. तेव्हा हिंदी बोलणार्‍या एका अनोळखी व्यक्तीने जवळ बोलवून घेऊन बिस्किट खायला दिले. व तुला तुझ्या वडिलांनी बोलावले आहे असे सांगून तिथून घेऊन गेला.

Advt.

श्रीनाथ याला अज्ञात व्यक्ति हांडेवाडी येथून रिक्षाने पुणे येथे घेऊन चालला होता. रिक्षामध्ये श्रीनाथ याने वडील कोठे आहेत याची विचारणा केली असता श्रीनाथ बरोबर असणारा व्यक्ति हा हिंदी भाषेत त्याला माहिती देत होता. माहिती देणारा व्यक्ति हा हिंदीमधून माहिती देत आहे यामुळे रिक्षाचालक सलीम शेख याला त्या व्यक्तीवर संशय आला. त्यामुळे सलीम शेख यांनी अज्ञात व्यक्तिला श्रीनाथ याच्याविषयी माहिती विचारली असता, श्रीनाथ हा भावाचा मुलगा असून तो लहानपणापासून पुण्यात राहत असल्याने मराठी बोलतो असे सांगितले. सलीम शेख यांना संशय बळावल्याने त्यांनी श्रीनाथच्या वडिलांना फोन करायला सांगितला. तेव्हा अज्ञात व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत दिसला तेव्हा रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेऊन विचरणा केली असता तेथून पळ काढला. त्याचा पाठलाग करतण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीनाथ बरोबर असल्यामुळे पाठलाग करता आला नाही.

सदर सलीम शेख याने श्रीनाथ याला घरचा पत्ता विचारला असता वडकी येथील असल्याचे समजले. त्यावरून ऊरुळी देवाची येथील पोलिस ठाण्यात असलेले पोलिस उपनिरीक्षक राजू महनोर, यांच्या पथकाने माहिती घेऊन तत्काळ पत्ता शोधला. श्रीनाथला राहुल मोडक व माधुरी मोडक यांच्या ताब्यात देण्यात आले. सलीम शेख यांच्या प्रसंगसावधानमुळे श्रीनाथचे अपहरण फसले व श्रीनाथ आईवडीलाना भेटू शकला. सलीम शेख यांनी केलेल्या कार्याबद्दल हवेलीच्या पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

रिक्षाचालक सलीम शेख यांच्यामुळे श्रीनाथ परत भेटला त्यामुळे श्रीनाथचे वडील राहुल मोडक यांनी रोख रक्कम दिली. मात्र रोख रक्कम घेण्यास सलीम शेख यांनी नकार दिला. यावर राहुल मोडक यांनी पोलिस अधिकार्‍यासमोर नवीन रिक्षा सलीम शेख यांना देणार असल्याची घोषणा केली.