पैसे वसुलीसाठी ‘संमोहन’ तज्ञाचे अपहरण करुन मारहाण ; उद्योजक, ढाबा मालकाविरोधात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी संमोहन तज्ञ  महेश काटे यांचे अपहरण करून तसेच त्यांना मारहाण करुन पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी औंधचे उद्योजक नाना गायकवाड व ‘तात्याचा ढाबा’चे मालक सचिन वाळके यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महेश पोपट काटे (वय ३७, रा. पाली, सुधागड, मुळ गाव पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी नानासाहेब शंकर गायकवाड (रा. औंध),  सचिन वाळके (रा. बाणेर), राजाभाऊ, विकास बालवडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश काटे हे संमोहन तज्ञ असून त्यांचे उपचार केंद्र आहे. त्यांनी व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने २०१७ मध्ये मावसभाऊ सचिन वाळके यांच्या ओळखीने उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्याकडून ३० लाख रुपये उसने घेतले होते.  त्यावेळी त्यांनी सिक्युरिटी म्हणून त्यांच्याकडून चार कोरे चेक घेतले होते. ३० लाख रुपयांपैकी १० लाख रुपये त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये परत केले होते. उर्वरित २० लाखापोटी ते दर महिना ८० हजार रुपये देत होते. अशा प्रकारे त्यांनी १६ लाख ८० हजार रुपये परत केले. जून २०१९ मध्ये त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना पैसे देणे शक्य झाले नाही. पैसे देण्यासाठी ते थोडा वेळ मागत असताना नानासाहेब गायकवाड हे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. राहिलेल्या रक्कमेपोटी नानासाहेब गायकवाड यांनी काटे यांची सुधागड तालुक्यातील आतोने येथील जमिनीचे खरेदी खत आपल्या पत्नीच्या नावे नोंदवून घेतले. तरीही त्यांची पैशाची मागणी सुरुच राहिली.

महेश काटे हे ३ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता पिंपळे सौदागर येथील घरी असताना त्यांना सचिन वाळके यांनी फोन करुन हॉटेल तात्याचा ढाबा येथे बोलावून घेतले. तेथे सचिन वाळके व विकास बालवडकर यांनी  त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत स्विफ्ट गाडीत बसवून घेऊन गेले. सुसगाव येथील  नानासाहेब गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर महेश काटे यांना ठेवण्यात आले. नाना गायकवाड व त्याच्या साथीदाराने काटे याला मारहाण केली. मारहाणी दरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत. या मारहाणीमुळे महेश काटे हे बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर त्यांना प्रॉपर्टी, घर व जमीन नावावर करुन टाक नाही तर तुला सोडणार नाही, असे गायकवाड यांनी धमकावले  व मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मावसभाऊ संदीप वाळके यांनी मध्यस्थी करत काटे यांना घरी आणले. या सर्व प्रकारामुळे महेश काटे हे घाबरुन गेले होते. त्यांनी शनिवारी रात्री चतु:श्रृंगी पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/