नाशिक : घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  भरदिवसा घरात घुसून एका सराईत गुन्हेगाराने कुटुंबीयांना मारहाण करत अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडगावात शनिवारी (दि. 29) ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायबा तानाजी संधान असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मुलीचे अपहरण, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा शनिवारी दुपारच्यावेळी गावातील एका घरात घुसला. त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरत तिला घराबाहेर ओढत आणले. यावेळी कुटुंबीयांनी विरोध करत मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने मुलीच्या आजोबांना मारहाण करत धमकी दिली. मुलीला मोटारीत बसवून तो पळून गेला. वणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

You might also like